भंगार विक्रीच्या नावाखाली चोरीची वाहने नष्ट   

बेल्हे, (वार्ताहर) : पुणे-नाशिक महामार्गालगत आळेफाटा परिसरात असलेल्या भंगार दुकानांमध्ये भंगार विक्रीच्या नावाखाली चोरीची दुचाकी, चारचाकी वाहने नष्ट केली जात असल्याचे समोर आले आहे.  
 
परप्रांतीय नागरिकांनी येथे भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परिवहन खात्याची परवानगी न घेता पुणे-मुंबई येथील जुनी वाहने आणून ती नष्ट केली जात आहेत. महागड्या जागा खरेदी करून दुकानासाठी मोठी शेड उभारून मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्ये अत्याधुनिक पद्धतीच्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या वाहनांना नष्ट करून हे भंगार अत्यंत महागड्या दरामध्ये विकले जात आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. आळेफाटा चौकातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावर दहा ते पंधरा मोठी दुकाने नियम धाब्यावर बसवून खुलेआम हा व्यवसाय करत आहेत.
 
पोलिसांना आळेफाटा परिसरात सुरू असलेल्या भंगार व्यवसायाबाबत कल्पना असतानाही ते या व्यावसायिकांवर कारवाई करताना दिसत नाहीत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून, या भंगाराचा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
 

Related Articles