राष्ट्रपती राजवटीबाबत केंद्र सरकारला शिफारस करा   

आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

 
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकार्‍यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. गेल्या दोन महिन्यातील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणार्‍या आहेत. राज्यपालांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन केली. 
 
राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्‍नी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आदींचा समावेश होता. 
 
राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना माहिती देताना पटोले म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वीही राज्यपालांना भेटून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अवगत केले होते, त्यानंतर त्यांनी पोलिस महासंचालकांना बोलावून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, आता नवीन पोलिस महासंचालक आलेत आणि कायदा सुव्यवस्था आणखी ढासळली आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास कमी झाला असल्याचे खुद्द पोलिस महासंचालक यांनीच मान्य केले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, पत्रकार वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. 22 जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. लहान लहान मुलांकडे शस्त्रे सापडत आहेत, अवैध शस्त्रांचा मोठा साठा राज्यात येत आहे.
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या राज्यात गुन्हेगारांना सरकारी संरक्षण मिळत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे, याची माहिती राज्यपाल महोदय यांना दिली. तसेच ‘निर्भय बनो’च्या सभांना संरक्षण दिले पाहिजे, निखील वागळे, असिम सरोदे, विश्‍वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, ही मागणी केली आहे. राज्यात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत आहे, हे पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस राज्यपालांनी केंद्र सरकारला करावी, ही मागणीही केली आहे, असे चव्हाण म्हणाले.
 

Related Articles