नागरिकांच्या आकांक्षांची पूर्ती : मोदी   

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत नागरिकांची आकांक्षा, स्वप्ने केंद्र सरकारने पूर्ण केली आहेत. 17 वी लोकसभा सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाची होती. देशाने या काळात मोठे बदल पाहिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी देश 17 व्या लोकसभेला निश्‍चितच लक्षात ठेवेल, असे सांगितले.
 
गेल्या पाच वर्षांत देशात अनेक सुधारणा झाल्या. ज्यामुळे 21 व्या शतकाचा पाया मजबूत झाला आहे. देश वेगाने मोठ्या बदलांकडे वाटचाल करत आहे. यामध्ये सभागृहातील सर्व सदस्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पाच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली. आपल्या अनेक पिढ्या ज्या गोष्टींची वाट पाहत होते, अशी बरीचशी कामे पाच वर्षांत पार पडली, असेही मोदी म्हणाले. अनेक पिढ्यांनी देशात एका राज्यघटनेची स्वप्ने पाहिली होती. सभागृहाने कलम 370 हटवून ते शक्य केले, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
 
देशाला पुढे जाण्यासाठी अनेक अडथळे दूर करावे लागतील. आम्ही अनेक अनावश्यक कायदे काढून टाकले आहेत. पाच वर्षांत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पण, सरकारने प्रत्येकावर मात केली. ही पाच वर्षे सुधारणेची, कामगिरीची आणि परिवर्तनाची होती, असेही पंतप्रधान म्हणाले. पाच वर्षांत संसदेचे ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तीन तलाक विरोधी कायदा आणला गेला. नारी शक्ती वंदन विधेयकदेखील याच पाच वर्षांत आणले गेले, असेही मोही यांनी सांगितले.
 
संसदेच्या नव्या इमारतीत आता कामकाज चालत असल्याचे सांगतानाच पंतप्रधानांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी सदैव स्मित हास्य पाहायला मिळाले. त्यांनी नि:पक्षपातीपणे सभागृहाचे नेतृत्व केले. सभागृहात अनेकदा गोंधळ आणि प्रचंड गदारोळ झाला. पण, त्यांनी ही परिस्थिती संयमाने हाताळली, असेही पंतप्रधान म्हणाले.
 

Related Articles