हल्दवानीत परिस्थिती नियंत्रणात शहराबाहेरील संचारबंदी हटवली   

हल्दवानी, (उत्तराखंड) : उत्तराखंडाच्या हिंसाचारग्रस्त हल्दवानी शहराच्या बनभूलपुरा परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरांतर्गत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, शहराबाहेरील संचारबंदी हटविण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
अवैधरीत्या बांधण्यात आलेली मशीद आणि मदरसे तोडल्यानंतर गुरूवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर, 60 हून अधिक जण जखमी झाले. एका पत्रकारासह साज जणांवर तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
 
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले. तसेच, कुमाऊँचे आयुक्त दीपक रावत चौकशीनंतर पंधरा दिवसांत अहवाल सरकारला सादर करतील, असेही ते म्हणाले. 
 
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी शहरांतर्गत भागात संचारबंदी तूर्तास कायम ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. पण, रुग्णालये आणि औषध दुकाने सुरू राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
काल सकाळी काही वेळासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंची नागरिकांनी खरेदी केली. पण, शाळा बंद होत्या. हिंसाचारग्रस्त भागात सतत गस्त सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) ए. पी. अंशुमन यांनी सांगितले.
 
हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, तीन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. या एफआयआरमध्ये 16 जणांचा समावेश आहे. त्यापैकी, पाच जणांना अटक झाली असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अफवा पसरू नयेत, यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपासून येथे तणाव आहे.
 

Related Articles