पाकिस्तानात त्रिशंकू स्थिती   

आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली

 
इस्लामाबाद/लाहोर : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथे आघाडी सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे सूतोवाच लष्कर प्रमुख जनरल आसम मुनीर यांनी शनिवारी केले. 
 
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनीदेखील आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचे सांगताना अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे सरकार बनवावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, मुनीर यांनी नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
 
इमान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने सर्वाधिक 100 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ नवाझ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाने 73, तर बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) 54 जागा जिंकल्या आहेत. मुथेहिदा कौमी मुव्हमेंटने 17 जागांवर विजय मिळविला आहे. तर, 11 जागांवर अन्य पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
 
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी 265 जागांसाठी मतदान झाले होते. बहुमतासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी 133 जागांची गरज आहे. पण, कोणत्याही पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे आघाडी सरकार काळाची गरज बनली आहे.
 
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे आवाहन लष्कर प्रमुख मुनीर यांनी केले आहे. ही बाब देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. इम्रान खान यांना विविध प्रकरणात शिक्षा झाली आहे. सध्या ते कारागृहात आहेत. निवडणूक आयोगाने इम्रान यांना निवडणूक लढविण्यास मनाई करतानाच त्यांच्या पक्षाला ‘बॅट’ चिन्ह गोठवले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मतदान गुरूवारी पार पडले होेते. मात्र, मतमोजणी दोन दिवस चालली 
 
इम्रान खान सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नवाझ यांचे बंधू आणि पाकिस्तानच पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली होती. तर, नवाझ शरीफ हेही मायदेशी परतले होते. मात्र, नवाझ यांच्या सत्ताधारी पक्षाला निम्म्याहून कमी जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी देखील आघाडी सरकार स्थापन करावे, असे मत व्यक्त केले आहे.
 

Related Articles