रफाहमध्ये ३१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू   

रफाह : इस्रायलने इजिप्‍त सीमा परिसरातील गाझा पट्टीला लागून  असलेल्या रफाह परिसरात शनिवारी हवाई हल्‍ले केले. त्यात 31 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
हमास दहशतवाद्यांवर जमिनीवरील कारवाई करण्यासाठीं दक्षिण गाझातील परिसर निर्मनुष्य करा, असा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्कराला नुकताच दिला होता. त्यानंतर परिसरात घबराट पसरली होती. यानंतर तेथे हवाई हल्‍ले चढविण्यात आले आहेत. 23 लाखांवर नागरिकांनी अगोदरच गाझा सोडून रफाह परिसरात आश्रय घेतला आहे. तेथेच हवाई हल्‍ले सुरू आहेत. दरम्यान, इस्रायलच्या ताब्यात एक तृतीयांश गाझा आली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांवर संकट निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हमास दहशतवादी आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय ते थांबणार नाही, असा इशारा पूर्वीचे नेतन्याहू यांनी दिला आहे. ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता कठोरपणे दहशतवाद्यांचा खात्मा करत आले आहेत. त्यात पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी जात आहे. हमास दहशतवाद्यांनी ओलिसांची सुटका करावी, यासाठी इस्रायल आक्रमक आहे. परंतु हमास दहशतवादी राजी नाहीत. प्रथम कारवाई आटोपती घ्यावी नंतर काय ते बघू अशी अडेलतट्टू भूमिका त्यांनी घेतल्याने युद्ध थांबण्याचे दूरच राहिले असून पॅलेस्टिनी नागरिक मात्र हवाई हल्ल्याचे शिकार बनू लागले आहेत. रफाह परिसरात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक हवाई हल्‍ले सुरू आहेत.
 

आतापर्यंत २८ हजार नागरिकांचा मृत्यू

 
गाझातील इस्रायलच्या आक्रमणानंतर आतापर्यंत 28 हजारांवर नागरिकांचा मृत्यू तर, 67 हजार नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासांत 117 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू असून 1 हजार 300 इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. 250 जणांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. इस्रायलने नागरी वस्तीवर हवाई हल्‍ले करून सर्वोच्च क्रूरतेची पातळी गाठल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काल केली. 
 

Related Articles