चुकांमधूनच चित्रकलेचा प्रवास अधिक यशस्वी होतो   

प्रकाश जोशी यांचे मत

 
पुणे : कोणतेच चित्र वाईट नसते. चित्रकारांच्या हातून झालेल्या चुकांमुळे ते अपुरे राहते. चित्रकला ही एक अशी कला आहे. ज्यामध्ये झालेली चुक सुधारण्याची संधी असते. खरे तर झालेल्या चुकाच चित्रकारांना पुढे घेऊन जात असतात. चुकीतून शिकायला मिळते. चुकांमधूनच चित्रकलेचा प्रवास अधिक यशस्वी होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार प्रकाश जोशी यांनी शनिवारी व्यक्त केले.
 
36 व्या अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती चित्रकला प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा जोशी यांच्या हस्ते काल टिळक स्मारक मंदिरात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक, कुलगुरू डॉ. गीताली टिळक या वेळी उपस्थित होते.
 
प्रकाश जोशी म्हणाले, कला कोठे व्यक्त करावी, हा चित्रकारांसमोरचा प्रश्‍न असतो. काढलेली चित्रे पाहणार कोण? असाही प्रश्‍न असतो. मात्र चित्रकार काढलेले चित्र समाज माध्यमावर टाकत असतात. त्यातून चित्रकलेचा दर्जा काय?  हे कळण्यास मार्ग नसतो. प्रत्येक चित्रकार आपापल्या परीने चित्र रेखाटत असतो. चित्रांच्या माध्यमातून व्यक्त असतो. पारितोषिक मिळाले नाही म्हणजे ते चित्र वाईट असते असे नाही. या चित्रात कल्पनेचे नवीन अंकुर असते. त्यामुळे चित्रकलेलो व्यासपीठ मिळणे ही खुप मोठी गोष्ट असल्याचेही जोशी यांनी नमूद केले. 
 
चित्रकार प्रत्येक चित्र मनापासून काढतो. त्यातील चुकाच्या माध्यमातून आपण चित्र चांगले वाईट ठरवत असतो. लोकमान्य टिळक व बरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती चित्रप्रदर्शनात मला सर्व प्रकारची व सर्व गटातील चित्रे पाहता आले. चित्रकार, विद्यार्थी, छायाचित्रकार यांना भेटता आले. त्यांच्या कलेतून त्यांची कल्पनाशक्ती पाहता आली. प्रदर्शनातील चित्रकारांनी उत्तमपणे अभिव्यक्त झाले आहेत. त्यांनी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने चित्र काढल्यास यातील चित्रकार नक्कीच जागतिक स्तरावर नाव कमावतील. असा विश्‍वासही प्रकाश जोशी यांनी व्यक्त केला. 
 
कलाप्रदर्शनातील कलाकार गटातून लोकमान्य टिळक पुरस्कार त्रिभुवन कुमार, जयंतराव टिळक पुरस्कार शुभेन्दू सरकार, बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक पुरस्कार रुपेश पवार, इंदुताई टिळक पुरस्कार कविता साळुंके, गौरीताई टिळक पुरस्कार राहुल बळवंत, तर गुरुवर्य बाबूराव जगताप पुरस्कार (जगताप पब्लिकेशन हाऊस) पूर्वा इंदानी यांना देण्यात आला.
 
विद्यार्थी गटातून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार अनिकेत देवगिरकर, नितीन कुमार, संकेत थोरात यांनी मिळविला. सचिन बन्ने यांनी तुलिका आर्ट गॅलरी पुरस्कार, अश्विन खापरे यांनी व्हीनस ट्रेडर्स पुरस्कार, तर मयुरी जौंजल यांनी कै. सुधीर बोधे पुरस्कार मिळविला. प्रशांत तरडे यांनी गुरुवर्य बाबूराव जगताप पुरस्कार प्राप्त केला. फोटोग्राफी श्रेणीत ईश्‍वरी खुडे, साक्षी शिंदे व अल्विन म्याथीव यांनी पारितोषिक मिळविले. या वेळी अशोक सातपुते, बोधे मांडववाले, तुलिका आर्ट गॅलरीचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार ईश्‍वरी खुडे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय ऐलवाड यांनी सूत्रसंचालन केले. शीतल मोरे यांनी आभार मानले. 

चित्रकलेला प्रोत्साहन मिळावे 

 
व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे उत्तम प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे चित्रकलेचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे. याच उद्देशाने अखिल भारतीय लोकमान्य टिळक व बॅरिस्ट व्ही. व्ही. ओक स्मृती चित्रप्रदर्शन भरविले जाते. या व्यासपीठावरून चित्रकलेला प्रोत्साहन मिळावे. चित्रकारांना व्यक्त होण्याचे बळ मिळावे, हीच आमची भूमिका आहे. दरवर्षी या चित्रप्रदर्शनाला देशभरातून प्रतिसाद वाढत चालला आहे. या चित्रप्रदर्शनामुळे देशभरातील चित्रकार संस्थेशी जोडले जात आहेत. या प्रदर्शनात चित्रकलेच्या विविध प्रकारांची भर पडत आहे. त्यामुळे चित्रप्रदर्शन आयोजनाचा हेतू साध्य होत असल्याचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले.  
 

Related Articles