संघर्षाला सहयोगामध्ये परावर्तित करा : श्री श्री रवीशंकर   

पुणे : लहान-लहान गोष्टींमुळे माणसांची मने दुखवली जात असून, त्यातून संघर्ष निर्माण होत आहे. मात्र, प्रत्येक संघर्षाला संवादामध्ये आणि संवादाला सहयोगामध्ये परावर्तित करता येऊ शकते. खरे शिक्षण तेच आहे, जे संघर्षाला सहयोगामध्ये परावर्तित करते. आपल्या देशाने खूप संघर्ष केला आहे. परंतु प्रत्येक संघर्ष आणि क्रांतीमध्ये देशाने शांतीचा मार्ग सोडला नाही, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनी केले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधिज्ञ उज्ज्वल निकम, उद्योजक मिलिंद कांबळे, कृषिरत्न अनिल मेहेर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदानासाठी सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कृष्णकुमार गोयल, प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे आणि हेमंत हरिभाऊ धात्रक यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित उपस्थित होते.  
 
श्री श्री रवीशंकर म्हणाले, आपल्या शिक्षणाचा स्तर खाली जाऊ नये याची खूप मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यापासून व्यसनांच्या आहारी जाण्यापासून थांबवावे लागेल. सर्व अनुचित प्रकारांना थांबवण्यासाठी आणि युवकांना योग्य मार्गावर घेऊन जात देशाला प्रगतिशील बनवण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात असून त्यामुळे अनावश्यक गोष्टींना बाजूला गेल्या आहेत. तसेच, काळ सुसंगत व आवश्यक असणार्‍या गरजा विचारात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. त्यातून व्यक्तीच्या व्यक्‍तित्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही चांगली बाब आहे. 
 
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे, याचाही मला अभिमान आहे. मी निश्चितपणे सांगू शकते की शिक्षण हीच माझ्या जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती आहे. शिक्षणामुळे सद‍्गुणांचा गुणाकार झाला पाहिजे आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे. हाच खरा शिक्षणाचा उद्देश आहे.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोच्च मानांकन विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करार करून शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय करण्यावर भर दिला जात आहे. 
 
दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमातील पहिल्या सत्रात कला, क्रीडा आणि साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना ‘युवा गौरव पुरस्कार’  प्रदान करण्यात आला. कला विभागातून चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मकरंद मधुकर माने, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अभिमन्यू समीर पुराणिक (बुद्धिबळ) आणि प्रणिता प्रफुल्ल सोमण (रोड सायकलिंग) आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या  श्री. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध महाविद्यालये, परिसंस्था आणि विशेष कामगिरी केलेल्यांनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 

Related Articles