निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व क्षेत्रातून निषेध   

पुणे : पुण्यात ‘निर्भय बनो’ सभेसाठी निघालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, शाईफेक अंडीफेक करीत हल्‍ला केला. त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. देशात विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची फार मोठी परंपरा आहे. भाजपला ही परंपरा खंडित करून हुल्लडबाजांचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करायची आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.  हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी समाजमाध्यात मागणी करत हल्‍लेखोरांचा निषेध व्यक्‍त केला.
 
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो या कार्यक्रमाला निखिल वागळे वक्ते होते. या कार्यक्रमासाठी येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात हल्ला करण्यात आला. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हल्ला केला. या प्रकरणावर आता कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर  म्हणाले, वागळे यांच्या गाडीवर हल्ला, शाईफेक करण्याची घटना लोकशाहीची हत्या आहे. भाजपने आपली भूमिका मांडावी, निषेध करावा; पण गुंडगिरी करून आणि महिलांवर हल्ला करून त्यांनी आपली भूमिका मांडू नये, ही साफ दडपशाही आहे. मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आणू नये, हा हल्ला पोलिसांच्या संगनमताने केला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
 
भाजपने सत्तेच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, ‘एफटीआय’मध्ये गोंधळ घातला आहे. आता ज्येष्ठ पत्रकार वागळे यांच्या गाडीवर हल्‍ला करण्याची हिंमत आली आहे. या गुंडांना गृहखात्याचा आशिर्वाद असल्याने बिनधास्तपणे ते  रस्त्यावर उतरत असल्याचा आरोप ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला. ते म्हणाले, पोलिसांनी राजकारणात हस्तक्षेप करणे योग्य नाही. भाजपने सभा घेऊन वागळे यांचा निषेध करायला हवा होता. परंतु, भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने त्यांनी हल्‍ला केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
 
निळी आणि काळी शाई घेऊन राजकीय रंगकर्मींनी पोलिसांना हाती घेऊन आमच्यावर भाजपने हल्‍ला केला. आमच्यावरील हल्‍ला लोकशाहीवर आहे, हे नागरिक जाणून असल्याचे विधिज्ञ असिम सरोदे यांनी सांगितले.
 
भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करीत दगडफेक केली. या संतापजनक घटनेत रस्त्यावरून जाणार्‍या काही मुली जखमी झाल्या. हा प्रकार घडत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. याप्रसंगी कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले होते का? अशा पद्धतीने जाहीर हुल्लडबाजी करण्याचा परवाना भाजपला कुणी दिला? या देशात विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची फार मोठी परंपरा आहे. भाजपला ही परंपरा खंडित करून हुल्लडबाजांचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करायची आहे का?, असा सवाल उपस्थित करून स्वराज्य पक्षाचे सदस्य आशिष भोसले यांनी निषेध व्यक्‍त केला.
 
लोकशाही अधिकार बजावणार्‍या नागरिकांना निर्भयतेने आपले कर्तव्य पार पाडण्यास संविधानाचे कवच पुरवले पाहिजे. याबाबतीत प्रशासन आणि पोलीस खात्यातील जबाबदार अधिकार्‍यांनी केवळ कामचुकारपणा केलेला नाही, तर या खुनी हल्ल्यास आपल्या वर्तनाने साह्य  असल्याचा आरोप भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केला. राज्यातील गोळीबारांच्या घटनांच्या पाठोपाठ पुण्यातील हल्ला हे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे लक्षण तर आहेच; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या भाजपच्या आशीर्वादाने होत आहे.
 

निखील वागळे हल्ल्याप्रकरणी महायुतीच्या दहा कार्यकर्त्यांना अटक

 
पुणे : सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहामध्ये जाण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांची मोटार अडवून त्यावर अंडी व दगडफेक केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी खंडोजीबाबा चौकामध्ये आणि सेनादत्त पोलिस चौकीजवळ घडला होता. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पर्वती पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी रात्री भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा जणांना अटक केली.
 
माजी नगरसेवक दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, पुढील तपासादरम्यान आणखी आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत श्रद्धा वसंत जाधव (वय 21, मुंढवा) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर कऱण्यात आल्यानंतर निखील वागळे यांनी अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांत टिका केली होती. त्यामुळे पुण्यात भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यातच ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा दलाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वागळे पुण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना खंडोजीबाबा चौकात अडवली व घोषणाबाजी केली. त्यानंतर, शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौक ते मांगीरबाबा चौक दरम्यान मोटार अडवून भाजप कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आणि शाईफेक केली, असे जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 
 

२५० कार्यकर्त्यांवर गुन्हा

 
दरम्यान, या सभेवरून झालेल्या गोंधळामुळे पर्वती पोलिस ठाण्यात सर्व पक्षांच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिस शिपाई अनिरुद्ध आनेराव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
 

आरोपींवर कठोर कारवाई : पुणे पोलिस

 
मोटारीवर हल्ला झाला त्यावेळी, आंदोलक आणि वागळे यांच्या वाहनामध्ये साध्या वेशातील पोलीस होते. मात्र प्रचंड वाहतूक आणि जवळ उभे राहणार्‍यांमुळे त्यांना आणि त्यांच्या गाडीला तात्काळ बाहेर काढणे शक्य नव्हते. घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध दंगल, मालमत्तेचे नुकसान इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
 

पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण

 
निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे पुण्यातील वातावरण तापले होते. वागळे पुण्यात पोहोचल्यावर आमचे पोलीस अधिकारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. त्यांना पुणे शहरातील वातावरणाची माहिती दिली. तसेच, आम्ही सांगत नाही तोपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ नका, असे पोलिसांनी सांगितले. कारण त्याठिकाणी आजूबाजूला मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आले आहेत. आंदोलकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जावे, असे वागळे यांना सांगण्यात आले. दरम्यान, सायंकाळी 6 वाजेपर्यंत 25 आदोलकांच्या गटाला ताब्यात घेण्यात आले असून आणखी काहींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होती. परिसर सुरक्षित करत नाही तोपर्यंत काही वेळ थांबण्यासाठी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिथून जाण्याचा आग्रह धरला. रस्त्यांवरील अवजड वाहतुकीमुळे अटकेची प्रक्रिया मंदावली असून बळाचा वापर करणे कठीण होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. परंतु, पोलिसांचा सल्ला डावलून, वागळे हे घटनास्थळी रवाना होण्यासाठी प्रत्यक्ष मार्गात बदल करुन पोलिसांना चकवून निघाले. तरी देखील साध्या वेशातील पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या मागे गाडी नेली.
 
 

Related Articles