कसोटीसाठी जाडेजा, राहुलला सशर्त संधी   

राजकोट : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका  खेळणार आहे. आतापर्यंत त्यापैकी दोन सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील एक सामना इंग्लंडनं, तर एक सामना टीम इंडियानं जिंकला आहे. आता पुढच्या तीन सामन्यांच्या निकालावर कसोटी मालिकेच्या विजयी संघाची घोषणा होणार आहे. 
 
अशातच गेल्या दोन सामन्यांत दिग्गज खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उर्वरित तीन सामन्यांत काहीसा दिलासा मिळणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण टीम इंडियाची रनमशीन असलेला दिग्गज विराट कोहली यानं मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमधूनही ब्रेक घेतला आहे. 
 
इंग्लंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम सिलेक्शनमधील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच उर्वरित तीन सामन्यांमध्येही विराट कोहली खेळताना दिसणार नाही.  वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
 
रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल या दोन्ही दिग्गज खेळाडूंचं इंग्लंडविरुद्धच्या संघात पुनरागमन झालं आहे. पण तसं असलं तरीसुद्धा फिटनेस टीमच्या मंजुरीनंतरच दोघांच्या सभागाबाबतचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच, जाडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील की, नाही हे अद्याप निश्चित नाही. दरम्यान, जाडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर राहावं लागलं होतं.
 
भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
 

आवेश खानची सुट्टी, आकाश दीपला संधी 

 
वेगवान गोलंदाज आवेश खानला स्क्वॉडमध्ये जागा मिळालेली नाही. पुढच्या तीन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघामधून आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.  निवड समितीनं शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आवेश खान बाहेर फेकला गेला आहे. आवेशसाठी रणजी करंडक सोयीचं ठरेल, असं सिलेक्शन कमिटीचं मत आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध आकाशनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते पाहून निवड समिती आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच प्रभावित झाले आहेत. 
 
सिराजचंही संघात पुनरागमन झालं असून त्याला दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. यानंतर चौथा सामना रांचीमध्ये होणार आहे. मालिकेतील हा चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. 
 

Related Articles