भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्‍वचषकाचा अंतिम सामना   

बेनोई : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवत 19 वर्षाखालील विश्‍वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज ऑस्ट्रेलियासमोर गतविजेत्या भारताचे आव्हान आहे. बेनोई इथे झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत 180 धावांचे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली आणि त्याने एका बळीने विजय मिळवला. स्पर्धेत भेदक गोलंदाजी करणार्‍या पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली होती. पण रॅफ मॅकमिलनने नाबाद 19 धावा करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. पाकिस्तानतर्फे अली रझाने 4 तर मिन्हासने 2 विकेट्स घेतल्या. हॅरी डिक्सन आणि सॅम कोन्तास यांनी 33 धावांची चांगली सलामी दिली. पण यानंतर अली रझाने सॅमला 14 धावांवर बाद केलं. कर्णधार ह्यूज वेइब्गन केवळ 4 धावा करुन तंबूत परतला. पाठोपाठ हर्जीत सिंगही माघारी परतला. रायन हिक्सला तर भोपळाही फोडता आला नाही. सलामीला येऊन खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या हॅरी डिक्सनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला.
 

Related Articles