पृथ्वी शॉ याचे शानदार दीडशतक   

मुंबई : गुडघा दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार्‍या पृथ्वी शॉने आपल्या दुसर्‍याच सामन्यात आपल्या बॅटमधील चमक तशीच कायम असल्याचे दाखवून दिले. छत्तीसगडविरुद्धच्या रणजी सामन्यात पृथ्वीने आज 159 धावांची खेळी केली, पण दुसर्‍या बाजूला कर्णधार अजिंक्य रहाणेचे अपयश कायम राहिलेकालपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईने दिवसअखेर 86 षटकांत 4 बाद 310 धावा केल्या. पृथ्वीने 18 चौकार आणि तीन षटकारांचा नजराणा सादर केला. त्याचा सलामीचा साथीदार भूपेन लालवानी यानेही शतक केले; परंतु सर्वात अनुभवी अजिंक्य रहाणे केवळ एका धावेवर बाद झाला. बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेल्या मुंबईसाठी आता बाद फेरी हे सराव सामन्यासारखे आहेत. त्यामुळे दडपणमुक्त खेळ करण्याची संधी आहे. पृथ्वी शॉने याच संधीचा फायदा घेत सुरुवातीपासून छत्तीसगडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. 102 चेंडूंतच त्याने शतक साजरे केले. त्यावेळी संघाच्या 136 धावा झाल्या होत्या. वेगवान शतकानंतर पृथ्वी काहीसा संयमी झाला, परिणामी 159 धावांसाठी त्याने 185 चेंडूंचा सामना केला. पृथ्वीचे तुफान धडकत असताना दुसरा सलामीवीर लालवानी केवळ त्याला साथ देण्याची भूमिका पार पाडत होता, पण त्यानंतर त्याने आपलीही शतकी खेळी साकार केली. 
 
मोसमातले हे त्याचे दुसरे शतक आहे. पृथ्वीसह त्याने 244 धावांची सलामी दिली. 2 बाद 289 अशी भक्कम धावसंख्या असताना आणि कोणतेच दडपण नसताना अजिंक्य रहाणे मैदानात आला; परंतु अवघे चार चेंडू खेळल्यानंतर तो बाद झाला. या मोसमातील दुसर्‍या आणि तिसर्‍या सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे.
 

धावफलक : मुंबई, पहिला डाव : 86 षटकांत 4 बाद 310 (पृथ्वी शॉ 159 - 185 चेंडू, 18 चौकार, 3 षटकार, भूपेन लालवानी 102 - 238 चेंडू, 10 चौकार, अजिंक्य रहाणे 1 - 4 चेंडू

 

Related Articles