E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
झारखंडचे राजकारण कोणत्या दिशेने?
Samruddhi Dhayagude
11 Feb 2024
शिवशरण यादव
हेमंत सोरेन यांना ‘ईडी’ने अटक केल्यानंतर चंपई सोरेन मुख्यमंत्री झाले. सोरेन कुटुंबातील कलह आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांतील खदखद यानिमित्ताने बाहेर आली.परंतु राज्यात आघाडी मजबूत असल्याने भाजपला ‘ऑपरेशन लोटस’ राबवता आले नाही. आता राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाते हे पहायचे.
हेमंत सोरेन यांना कथित गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने अटक केल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शिबू सोरेन यांच्या कुटुंबातील सदस्य अडून बसले होते. हेमंत सोरेन यांच्या पत्नीचा तसेच वहिनीचाही मुख्यमंत्रीपदावर डोळा होता. बिहारमथ्ये लालूप्रसाद यादव यांना अटक झाल्यानंतर जशी राबडीदेवींची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली, त्याच प्रकारे सोरेन यांच्या कुटुंबातील दोनपैकी एका महिलेची निवड होईल, असे वाटत होते; परंतु झारखंडच्या राजकारणात चंपई सोरेन यांचा नव्याने उदय झाला. त्यांच्या उदयाने बिहार आणि तामिळनाडूच्या राजकारणाची आठवण करून दिली.
बिहारच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या संदर्भात दोन प्रयोग चर्चेत राहिले. एक म्हणजे राबडीदेवींना मुख्यमंत्री करणे आणि दुसरे जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळणे. जीतनराम यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री करण्याशी समांतर प्रयोग यापूर्वी तमिळनाडूमध्येही पहायला मिळाला आहे. या दोन्ही प्रयोगांचे वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. चंपई सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हते. निदान सुरुवातीच्या टप्प्यात तरी. हेमंत सोरेन यांना पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. आपण मुख्यमंत्रीपदी परत येईपर्यंत खुर्ची सुरक्षित हातात राहील, असा त्यांचा प्रयत्न होता.
बिहारमध्ये लालू यादव यांनी तुरुंगात जाताना आपल्या पत्नी राबडीदेवी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले होते. हेमंत सोरेन यांनीही कल्पना सोरेन यांच्यासाठी सल्लागारांची फौज तैनात करण्याची योजना आखली होती. मात्र पक्षाच्या आमदार सीता सोरेन यांच्या विरोधामुळे हेमंत सोरेन यांना अपेक्षित निर्णय घेता आला नाही. सीता या हेमंत यांच्या भावाच्या पत्नी-वहिनी-आहेत. ‘आपण हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले; परंतु कल्पना यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही,’ असा उघड संदेश त्यांनी सासर्यांपर्यंत पोचवला. कौटुंबिक कलह इतका वाढला की कंटाळून हेमंत याम्नी कुटुंबाबाहेर पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यात त्यांना चंपई सोरेन हेच सर्वात योग्य आणि सुरक्षित पर्याय आणि सर्वात विश्वासार्ह वाटले.
झारखंडमध्ये भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या कोल्हान भागातून चंपई सोरेन निवडून आले आहेत. त्यांना कोल्हानचा सिंह असेही म्हणतात. आता सोशल मीडियावर त्यांना झारखंडचा सिंह म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली आहे. शिबू सोरेन यांचे जवळचे सहकारी आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक इतकाच चंपई यांचा परिचय नाही. ते शिबू सोरेन यांचेच नव्हे, तर हेमंत यांचेही अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. पक्षात तसेच कुटुंबात त्यांचा खूप आदर केला जातो.
एका जुन्या छायाचित्रात हेमंत सोरेन वाकलेल्या मुद्रेत दिसत असून चंपई त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. जणू हेमंत सोरेन आणि चंपई सोरेन यांचे एकमेकांशी पिता-पुत्राचे नाते असावे. अर्थात झारखंड मुक्ती मोचाने चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्याचे हे एकमेव कारण नाही. कोल्हान भाग हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अर्जुन मुंडा आणि रघुबर दास हे भाजपचे दोन नेते मुख्यमंत्री होते.अन्य माजीे मुख्यमंत्री मधु कोडा हे देखील कोल्हान भागातील होते. 2019 मध्ये झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या भागातील 13 जागांवर भाजपच्या उमेदवारांना फारच कमी मते मिळाली. भाजपला सर्वात मोठा धक्का झारखंड पूर्व भागातील मतदारसंघात बसला. तिथे तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास भाजपचे बंडखोर नेते सरयू राय यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले. चंपई यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यामागे हे ही एक खास कारण असल्याचे दिसले. ते सध्याच्या परिस्थितीत राजकीयदृष्टया योग्य मानले जाऊ शकते.
चंपई सोरेन उपकृताच्या भावनेने काम करत आहेत; परंतु त्यांचा विचार बदलला तर काय, अशी भीती आता सोरेन कुटुंबात आहे. सत्ता ही अशीच गोष्ट आहे. राजकारणातही युद्ध आणि प्रेमाप्रमाणे सर्व काही न्याय्य मानले जाते. हेमंत सोरेन यांच्यावर विश्वास ठेवला तर तेही राजकारणाचे बळी ठरले आहेत.हेमंत सोरेन यांच्या नशिबी काय वळण येणार, हे कालौघातच कळेल.आपल्या राजकीय कुशाग्रतेमुळे बिहारच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या नितीशकुमार यांचीही अशा एका प्रकरणात चूक झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी जीतनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. तामिळनाडूमध्ये तुरुंगात जाण्याच्या धोक्याचा सामना करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी ओ. पनीरसेसल्वम यांच्याकडे खुर्ची सोपवली होती. जयललिता तुरुंगातून परत येताच ओ. पन्नीरसेल्वम जयललिता यांच्याकडे खुर्ची सोपवत असत; परंतु बिहारमध्ये जीतनराम मांझी यांनी असे करण्यास नकार दिला. खुर्ची सोडण्यास सांगितले असता मांझी पसार झाले.
त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की भाजपने केंद्रात सत्ता काबीज केली होती आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली होती. मांझी यांना पसंत करणारे बिहार सरकारचे काही नोकरशहा त्यांचे सल्लागार बनल्याचे ऐकिवात होते. राजकीय समीकरणेही अशी होती की सल्लागारांसोबत मांझी यांनाही भाजपकडून पाठिंबा मिळू लागला. मांझी नितीशकुमार यांच्याविरोधात विधाने करत राहिले. नंतर त्यांना हार पत्करावी लागली. नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवले. मांझी यांच्याकडून सत्ता परत घेण्यासाठी नितीशकुमारांना बाजू बदलून मुख्यमंत्री बदलण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली नाही. नंतर तर मांझी यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला; परंतु त्यांच्या ‘हिंदुस्तान अवामी मोर्चा’ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचे चार-पाच आमदार निवडून येत राहिले.
प्रदीर्घ संघर्षानंतर बिहारपासून वेगळे होऊन झारखंडची निर्मिती झाली. त्या वेळी झारखंडमध्ये वेगळ्या राज्यासाठी आंदोलन झाले होते. झारखंडचा विकास होत नाही आणि झारखंड ही बिहारची वसाहत राहिली आहे, अशी टीका केली जात होती. त्यामुळे स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याचा आग्रह धरला गेला; परंतु स्वतंत्र राज्य झाल्यानंतर झारखंडची वाटचाल विकासाऐवजी विनाशाकडे सुरू झाली आहे. खनिज संपत्तीने समृद्ध राज्य अजूनही विकासाच्या बाबतीत झारखंड फारच मागे आहे.
झारखंडच्या स्थापनेला केवळ दोन तपे झाली आहेत. गेल्या दोन तपांमध्ये झारखंडने 11 मुख्यमंत्री बघितले आहेत. चंपई सोरेन हे झारखंडचे बारावे मुख्यमंत्री आहेत. 11 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त एकालाच आतापर्यंत कार्यकाळ पूर्ण करता आला. उर्वरित दहाजणांपैकी कुणालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. अशा अस्थिर परिस्थितीत आता चंपाई सोरेन यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी फारच कमी काळ मिळाला आहे. त्यात ते काय करणार, हे पहायचे.
Related
Articles
अजय-अतुल यांच्या गीतांवर तरूणाईने धरला ठेका
12 Sep 2024
ध्वनी प्रदूषण तपासणीसाठी १२६ पथके तैनात
17 Sep 2024
गेल्या दहा वर्षांत लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न : खर्गे
16 Sep 2024
छत्तीसगढमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
15 Sep 2024
जुन्या चित्रपटगीतांनी रसिक भारावले
15 Sep 2024
ब्रिटनच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात