E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
वानवा-श्रोत्यांची आणि दर्जाची
Samruddhi Dhayagude
11 Feb 2024
संजय ऐलवाड
विचारांची देवाण- घेवाण करण्याचे व्यासपीठ म्हणून साहित्य संमेलनाचे स्थान मराठी वाड्:मय विश्वात सर्वोच्च आहे. श्रोता हा संमेलनाचा आत्मा आहे. मात्र अमळनेर येथे पार पडलेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ना विचारांची देवाण-घेवाण झाली, ना श्रोत्यांची गर्दी. त्यामुळे संमेलनातून प्रबोधन ही संकल्पनाच जुनी झाली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला. संमेलन आयोजक आणि साहित्य महामंडळ संमेलन यशस्वी करण्यात वारंवार अपयशी ठरत आहेत. त्यामुळे क्रांतिकारी बदल करण्याची गरज आहे. सरकार आणि प्रशासनाचा वाढता हस्तक्षेप आणि त्यास बळी पडत असलेले साहित्य महामंडळ येत्या काळात तरी काळानुरूप बदल करून संमेलने यशस्वी करणार का?
संमेलन कोणतेही असो, श्रोते हे त्या संमेलनाचा आत्मा असतात. त्यामुळेच संमेलनाचे यश श्रोत्यांच्या प्रतिसादावरून मोजले जाते. अमळनेरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे श्रोत्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन, नियोजन आणि त्यातील उणीवांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
मात्र याच शहरात याच काळात पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे कौतुक झाले. सर्व जबाबदारी आयोजकांवर सोपवून साहित्य महामंडळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनाचा दर्जा खालावत चालला आहे. यात वेळीच सुधारणा न झाल्यास येत्या काळात संमेलन आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
प्रबोधन हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे; मात्र ज्यांच्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून संमेलनाचे आयोजन केले जाते. ते श्रोते संमेलनाकडे पाठ फिरविणार असतील, तर साहित्य संमेलनाचे भवितव्य धोक्यात येणार हे निश्चित आहे. सरकारने संमेलनाच्या निधीत वाढ केल्यापासून संमेलनावर सरकारचा पगडा, तर संमेलनातील आयोजनात स्सरकारी प्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढला आहे. एका अर्थाने साहित्य महामंडळ सरकारीा निधीच्या ओझ्याखाली दबले जात आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात संमेलनात काहीच नको? या मुद्द्यावर साहित्य महामंडळ आणि साहित्य संस्थांमध्ये वाद निर्माण होत आहेत. मुळात संमेलनातील रोखठोक भूमिकाच नामशेष होत असल्याने साहित्य संमेलनाविषयीचे आकर्षण श्रोत्यांच्या मनातून कमी होत आहे की काय? असा प्रश्न अमळनेर येथील संमेलनामुळे निर्माण झाला आहे.
संमेलनाआधी शहर आणि संपूर्ण आजुबाजूच्या परिसरात साहित्याचे वातावरण निर्माण करणे ही आयोजक संस्थेची जबाबदारी असते. तसेच परिसरातील साहित्यिक, साहित्य संस्था, साहित्य चळवळी, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना संमेलनात सहभागी करून घेणे हेही आयोजकांचे कर्तव्यच असते. मात्र अलीकडच्या काळात संमेलन आयोजकांना साहित्यिक वातावरण निर्माण करण्यापेक्षा राजकीय वातावरण निर्माण करण्यात अधिक रस वाढत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात राजकारण्यांना महत्त्व देण्याच्या नादात साहित्यिक आणि श्रोते मात्र संमेलनापासून दुरावत चालले आहेत.
अमळनेर येथे पार पडलेल्या संमेलनाच्या पत्रिकेत आठ मंत्र्यांची नावे होती. संमेलनाच्या व्यासपीठावर खरेच इतक्या मंत्र्यांची गरज आहे का? याचा विचार आयोजक व साहित्य महामंडळाने करण्याची गरज आहे. उणीवांबाबत साहित्य महामंडळाने आयोजकांवर आणि आयोजकांनी साहित्य महामंडळावर बोट दाखविण्यापेक्षा संमेलनाच्या आयोजनात सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा साहित्य संमेलन हे कालबाह्य होण्यास अधिकचा वेळ लागणार नाही.
या संमेलनात निवास व्यवस्थेचा प्रचंड गोंधळ होता. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्यातून संमेलनस्थळी दाखल झालेल्या साहित्यिक, श्रोत्यांना निवास व्यवस्थेसाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. अनेकांना मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करावा लागला. ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ हे संमेलन स्थळ शहराबाहेर होते. त्यामुळे संमेलन नगरीत पोहचण्यासाठी स्थानिकांसह साहित्यिकांनाही कसरत करावी लागत होती.
प्रतिसादा अभावी ग्रंथ दालन पहिल्या दिवसांपासून शेवटपर्यंत रिकामे राहिले. अनेक प्रकाशक, ग्रंथ विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. अत्यल्प विक्रीमुळे अनेकांचे गाळ्याचे भाडेही निघाले नाही. त्यामुळे वाहतूक खर्च, कामगार, त्यांची निवास व्यवस्था, भोजन आदी खर्चही त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे प्रकाशकांनीही संमेलनाच्या आयोजकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संमेलननाचे आयोजक आणि साहित्य महामंडळ प्रकाशकांच्या अडचणींकडे लक्ष देणार नसेल, तर प्रकाशकांना पुढच्या संमेलनात सहभागी होण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही प्रकाशकांना द्यावा लागणे ही साहित्य महामंडळासाठी दुर्दैवाची बाब आहे.
साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीला अमळनेरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे संमेलन यशस्वी होणार असे वाटत होते; मात्र ग्रंथदिंडीचे उत्साहाने स्वागत करणारे अमळनेरकर संमेलन नगरीकडे फिरकलेच नाहीत. उद्घाटन सोहळ्याला राजकीय व्यक्ती उपस्थित असल्याने राजकीय कार्यकर्त्यांनी संमेलन नगरीत गर्दी केली. मात्र उद्घाटन संपले, मंत्री व्यासपीठावरून खाली उतरले की, कार्यकर्तेही बाहेर पडले. त्यामुळे ज्या कार्यक्रमाला राजकीय व्यक्ती तेथे गर्दी आणि ज्या कार्यक्रमाला साहित्यिक तेथे मात्र श्रोत्यांचा अभाव असे चित्र संपूर्ण संमेलनात पाहण्यास मिळाले.
कवी संमेलन, कथा कथन, परिसंवाद, परिचर्चा, मुलाखत, अभिरूप न्यायालय आदी कार्यक्रम मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडले. काही कार्यक्रमांना तर व्यासपीठावरील वक्त्यांना श्रोत्यांची प्रतीक्षा करावी लागली. काही कार्यक्रम श्रोते नसल्यामुळे लांबणीवर टाकावे लागले. त्यामुळे आयोजक आणि अमळनेरकरांना साहित्य संमेलनाचे गांभीर्यच कळाले नाही, अशीही चर्चा साहित्य नगरीत रंगली होती. जे काही लोक कुटुंबासह संमेलन नगरीत आले. ते लोक कार्यक्रमाला न थांबता सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्यात, तसेच खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांवर ताव मारण्यात मग्न होते. त्यामुळे मुख्य मांडव, उपमांडव आणि ग्रंथ दालनात श्रोत्याची गर्दीच होत नव्हती.
संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या भाषणातील बेकारी, देशीवाद, महागडे शिक्षण, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, शाळांचे खासगीकरण, शासनाचा वाड्:मयीन क्षेत्रात वाढत असलेला हस्तक्षेप आदी मुद्दे प्रभावी ठरले. ज्येष्ठ समाज सेवक गिरीश प्रभुणे यांची मुलाखत, अभिरूप न्यायालय, कथाकथन, तृतीय पंथीयांचे साहित्यातील योगदान, खान्देशी बोली व त्यांचे अस्तित्व आदी कार्यक्रम चांगले झाले. नेहमीप्रमाणे बाल मेळावा, गझल कट्टा, कवी कट्टा आणि प्रकाशन मंच दुर्लक्षित राहिले. भोजन व्यवस्था चांगली होती. मात्र निवास व्यवस्थेवरून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुळात मागील काही वर्षांपासून साहित्य महामंडळ तालुक्याच्या ठिकाणची निमंत्रणे स्वीकारत आहे. छोट्या शहरांना अनेक मर्यादा असल्याने त्याचा थेट परिणाम संमेलनावर होत आहे. त्यामुळे येत्या काळात किमान जिल्ह्याच्या ठिकाणी संमेलनाचे आयोजन करणे गरजेचे आहे. तसेच संमेलन आयोजकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून संमेलनाचे आयोजन यशस्वी होईल, याकडे साहित्य महामंडळाने लक्ष द्यावे. सरकार संमेलनासाठी निधी देते म्हणून प्रत्येक गोष्ट सरकारच्या मनासारखी करणे हे साहित्य महामंडळाने टाळले पाहिजे. संमेलनाच्या पत्रिकेच्या आखणीत शासन आणि प्रशासनाचा हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. साहित्यातील सर्व प्रवाहातील दर्जदार साहित्यिकांना संमेलनात सहभागी करून घेतल्यास त्याचा संमेलनावर नक्कीच चांगला परिणाम होईल. अन्यथा साहित्य संमेलनाचा दर्जा दिवसेंदिवस खालावतच राहणार आहे.
Related
Articles
शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न?
09 Jan 2025
कॅनडातील सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी सचित मेहरा
08 Jan 2025
रोहित,विराटचे भवितव्य निवड समितीच्या हातात : गावसकर
08 Jan 2025
आफ्रिका क्रमवारीत दुसर्या स्थानी
08 Jan 2025
कारखान्याची चिमणी कोसळली
10 Jan 2025
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह
08 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)