जबरदस्त ‘जस्सी’   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे 

 
तो ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदा आपल्या समोर आला. मुंबई इंडियन्स कडून खेळताना सगळ्यात आधी जाणवलं की त्याची गोलंदाजी करण्याची शैली काहीतरी वेगळी आहे. अर्थात त्याची गोलंदाजी भन्नाट होती, त्याचा वेग देखील चांगला होता. आणि आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने संघासाठी तीन बळी मिळवले होते. फर्स्ट क्लास क्रिकेट आणि आयपीएलपासून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आपण सगळ्यांनीच बघितला आहे. आज जसप्रीत बुमरा भारतीय क्रिकेटचा महत्वाचा भाग आहे, आणि गेली अनेक वर्षे तो समर्थपणे आपल्या संघाची धुरा वाहतो आहे. 
 
अहमदाबाद मध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेला जसप्रीत लहानपणापासूनच गोलंदाज बनण्याचं स्वप्न घेऊन जगत होता.  वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलेलं, आई शाळेत शिक्षिका. आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं ही तिची मनापासूनची इच्छा. छोट्या जसप्रीतला मात्र क्रिकेटचं मैदान खुणावत असे. त्या वयात अहमदाबाद मध्ये किशोर त्रिवेदींनी त्याला घडवायला सुरुवात केली. त्याची गोलंदाजीची शैली लहानपणापासूनच विचित्र होती. पण त्रिवेदी सरांनी ती बदलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्याचा वेग आणि त्याची गोलंदाजीची शैली ही त्याला दैवी देणगी आहे असेच त्यांचे मत होते. जर फक्त 15 पावलांच्या रन-अप नंतर तो 140 किमी प्रति तास या वेगाने गोलंदाजी करत असेल तर ती देवाचीच देणगी म्हटली पाहिजे. 
 
तो 14-15 व्या वर्षी माझ्याकडे आला तेंव्हा त्याच्या वयाचे नाही, तर त्याच्यापेक्षा मोठे फलंदाज देखील त्याला घाबरून असायचे. तो चेंडू ’फेकतो’ असे त्यांचे मत असायचे. पण खरी गोष्ट ही होती की त्याची गोलंदाजी शैली अवैध नक्कीच नव्हती. आम्ही त्याच शैलीमध्ये त्याच्या गोलंदाजीत सुधारणा करत गेलो. त्याकाळी अनेक उत्तमोत्तम शालेय संघ अहमदाबाद मध्ये खेळण्यासाठी येत असत. त्याचाही फायदा बुमराला झाला. पुढे गुजरातच्या निवड समितीची त्याच्यावर नजर पडली नसती तरच नवल होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्रिवेदी सर सांगत होते. 
 
पण जसप्रीत बुमरा खर्‍या अर्थाने प्रसिद्धीला आला तो आयपीएलमुळे. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला 2013 मध्ये आपल्या संघात घेतलं आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. पुढे तीन वर्षात, 2016-17 मध्ये तो भारतीय संघात दाखल झाला होता. तो काळ भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांच्या संक्रमणाचा होता. इशांत शर्मा, आशिष नेहरा सारखे गोलंदाज निवृत्त होत होते. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि नुकताच आलेला महमद शमी भारतीय संघातील वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत होते. अशावेळी  संघात आलेल्या बुमराने अल्पावधीतच आपल्या गोलंदाजीने एक वेगळीच दहशत निर्माण करायला सुरुवात केली होती. 
 
मुंबई इंडियन्स संघातील त्याचा साथीदार आणि मेंटॉर असलेल्या लसिथ मलिंगाची देखील त्याला या काळात चांगली मदत झाली. बघता बघता खेळाच्या तीनही प्रकारांमध्ये जसप्रीत बुमराहहे नाव मोठं होत होतं. बुमरा म्हणजे वेग, बुमरा म्हणजे अचूकता, बुमरा म्हणजे फलंदाजाच्या अगदी पायाशी टाकलेला यॉर्कर चेंडू असं समीकरण तयार व्हायला फारसा वेळ लागला नाही. 
 
सेना देश (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) म्हणजे वेगवान गोलंदाजीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आणि त्यात तिथल्या खेळपट्टीची देखील कायम मिळणारी साथ. अशावेळी बुमराच्या गोलंदाजीने तिथे आपला प्रभाव टाकायला सुरुवात केलीच, पण भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर देखील बुमराचा वेग आणि अचूकता यांचं मिश्रण कायम होतं.  शमी आणि नंतर आलेला महमद सिराज यांच्या साथीनं बुमराने भारतातील वेगवान गोलंदाजांची मोठी फळी तयार केली.
 
एकेकाळी भारतीय गोलंदाज म्हणजे फक्त फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जात असत, पण आज आपल्या वेगवान गोलंदाजांनी देखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, आणि त्याचं मोठं श्रेय जसप्रीत बुमराला नक्कीच जातं. बुमरा मध्ये जात्याच एक नायक दडला आहे. त्यामुळे या गोलंदाजांच्या चमूचं नेतृत्व आपसूकच त्याच्याकडे आलं आणि त्याने देखील त्या नेतृत्वाची जाण ठेवून भारतीय गोलंदाजी कशी समर्थ होईल त्याकडेच लक्ष दिलं. 
 
वेगवान गोलंदाज म्हटलं की दुखापती आल्याच, आणि बुमरा देखील त्यापासून दूर नव्हता. 2018 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीनही प्रकारच्या फॉरमॅट्स मध्ये आपली छाप पडायला सुरुवात केलीच होती. त्यात त्याच्या कामाचा भार देखील वाढत चालला होता. भारतीय संघ बारा महिने, तेरा त्रिकाळ मैदानावर खेळणार, आणि प्रत्येक वेळी गोलंदाजीला जसप्रीत बुमरा पाहिजेच. अशावेळी तो सतत मैदानावर असे. त्यात भरीस भर म्हणून 2 महिने आयपीएल आहेच. अशावेळी दुखापत होणे स्वाभाविकच होते.
 
तो काही काळ मैदानापासून दूर होता. त्यावेळी अनेक जाणकारांनी त्याच्या विचित्र शैलीला दोष दिला. तो आता परत त्याच जोमाने खेळेल का हा देखील प्रश्न होताच. पण तो परत आला, आणि त्यानंतरही ना त्याची अचूकता कमी झाली, ना त्याचा वेग थांबला. जसप्रीत बुमरा त्याच जोमाने, त्याच वेगाने ’टो क्रशिंग यॉर्कर’ टाकत राहिला. नुकतंच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 150 बळींचा टप्पा पार केला आहे. एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये देखील तो 150 बळींच्या अगदी जवळ आहे, तर टी-20 क्रिकेटमध्ये 75 बळी त्याच्या नावावर आहेत. 
 
कपिल देव नंतर भारताने अनेक वेगवान गोलंदाज बघितले. पण खर्‍या अर्थाने त्यामध्ये वेगवान ठरले श्रीनाथ, झहीर आणि इशांत शर्मा. तीच परंपरा बुमरा नेटाने पुढे नेत आहे. वेगवान गोलंदाजांची कारकीर्द फार मोठी नसते (काही सन्माननीय अपवाद वगळता). अशातच भविष्याकडे लक्ष ठेवून जसप्रीत बुमराने योजना आखल्या तर कदाचित तो दीर्घकाळ भारतीय क्रिकेटची सेवा नक्की करेल. आज तो 30 वर्षांचा आहे, पुढील 4-5 वर्षे तरी तो जोमाने गोलंदाजी करेल याची खात्री आहे. 
 
बुमरा आता फक्त स्वतःच्या गोलंदाजीकडेच लक्ष देत नाही, तर नवीन येणारे गोलंदाज कसे घडतील, त्यांना बरोबर घेऊन कसे मार्गक्रमण करता येईल याकडे देखील लक्ष देऊन आहे. बुमराह हा सध्याच्या जमान्यातील मोठा गोलंदाज आहे, आयसीसी रँकिंगमध्ये तीनही प्रकारां मध्ये तो कायम पहिल्या दहात राहिला आहे. आणि वेगवान गोलंदाजी प्रती असलेलं त्याचं प्रेम सर्वश्रुत आहेच. जसप्रीत बुमरा उर्फ जस्सी या खेळाडूने तमाम क्रिकेट रसिकांना निव्वळ आनंद दिला आहे यात काहीच शंका नाही. आणि त्यामुळेच अगदी मनापासून म्हणावंसं वाटतं, ’जस्सी जैसा कोई नहीं’. 
 

Related Articles