‘हस्ती कन्या’!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

 
दरवर्षी जाहीर होणार्‍या पद्म पारितोषिकांच्या किंवा ‘किताबांच्या’ यादीत  काही अपरिचित नावेही असतात. नावे अपरिचित असली तरी ती कमी कर्तृत्ववान असतात असे नाही. या वेळच्या पद्मश्री सन्मानार्थींच्या यादीत असणारे पार्वती बरुआ हे असेच एक नाव. बरुआ यांना क्वचितच प्रसिध्दीच्या झोताचा लाभ झाला असेल. पण आता पद्मश्री सन्मान मिळाल्याने त्या चर्चेतील चेहरा ठरल्या आहेत.
 
वयाच्या सत्तरीत असणार्‍या बरुआ यांना ‘हस्ती कन्या’ म्हटले जाते.  कारण त्यांचे कार्यच हत्तीच्या संबंधित क्षेत्रात आहे. निसर्गावर मानवाकडून होत असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम वन्यप्राणी नागरी वस्तींमध्ये शिरण्यावर झाला आहे. हत्ती हे जितके बुद्धिमान प्राणी तितकेच आक्रमक देखील. त्यांची शक्तीही अफाट. मानवी वस्त्यांमध्ये, शेतांमध्ये शिरून हत्ती नुकसान करू लागले की माणसे त्या हत्तीला ठार करतात किंवा  माणसांना ते हत्ती तरी पायाखाली चिरडतात. हा मानव-हत्ती संघर्ष होऊ नये आणि मानवापासून हत्ती आणि हत्तींपासून मानव सुरक्षित राहावा यासाठी गेली पन्नास वर्षे अव्याहतपणे बरुआ स्वतःस झोकून देऊन काम करत आल्या आहेत. पहिल्या महिला माहूत होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे. मात्र तरीही देशात त्यांना फारशी प्रसिद्धी लाभलेली नाही हे नाकारता येणार नाही.
 
1953 मध्ये आसामच्या गौरीपूर येथे जन्मलेल्या पार्वती या क्षेत्राकडे वळल्या हे आश्चर्यकारक आहेही आणि नाहीही. हत्तींना पकडणे, त्यांना प्रशिक्षण देणे, ते चिडलेले असतील तर त्यांना शांत करणे हे सगळे केवळ कठीण असते असे नाही तर प्रसंगी जीवावर बेतणारे असते. बरुआ यांना आपला जीव धोक्यात घालून हे करणे अपरिहार्य नव्हते. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला. त्यांचे वडील प्रकृतीश बरुआ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हत्ती तज्ज्ञ. चुलते अभिनेते. थोरली बहीण प्रख्यात लोकगीत गायिका. स्वतः पार्वती यांचे राज्यशास्त्र शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले. घरची श्रीमंती. तेंव्हा आरामाचे जीवन सोडून त्या या धोकादायक क्षेत्रात शिरल्या हे आश्चर्य. 
 
पण आश्चर्य नसण्याचे कारण म्हणजे लहानपणापासून त्यांना हत्तींचा सहवास लाभला; हत्तींचाच लळा लागला. तेंव्हा हत्ती आणि पार्वती यांच्यात बंध तयार होणे अगदी स्वाभाविक. माणसांशी मैत्री कारण्यापेक्षाही हत्ती हे मैत्री करण्यास जास्त पात्र अशी पार्वती यांची धारणा झाली तर नवल नाही.
 
पार्वती यांचे वडील शिकारी होते आणि अनेक वाघांची शिकार त्यांनी केली असली तरी त्या घराण्यात हत्तींबद्दल मात्र आदरभाव असल्याने एकाही हत्तीची शिकार त्यांनी केली नव्हती. पार्वती यांचे वडील आपला कुटुंबकबिला घेऊन अनेक महिने जंगलातच ठाण मांडून बसत. अनेक हत्ती त्यांनी पाळले होते. राजघराण्यातील असले तरी वास्तव्याच्या महालापेक्षा या कुटुंबाला अप्रूप होते ते हत्ती महालाचे -ज्यात अनेक हत्ती होते. एका अर्थाने पार्वती यांनी डोळे उघडले तेंव्हा त्यांच्या दृष्टीस सर्वप्रथम हत्तीच पडला असावा. ज्या हत्तींना प्रकृतीश पकडत असत त्यांना प्रशिक्षित करीत असत आणि अशा हत्तींना भूतान, जयपूर अशा राजघराण्यांकडून मागणी असे. 
 
मात्र पुढे सरकारने संस्थानिकांचे तनखे बंद केले; हत्तींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यावर निर्बंध आणले तेंव्हा अनेक हत्ती पाळायचे कसे हा प्रश्न बरुआ कुटूंबासमोर उपस्थित झाला. अर्थात त्याने पार्वती यांच्या संकल्पावर परिणाम झाला नाही. आपल्याला माहूतच बनायचे आहे हा त्यांचा निश्चय पक्का होता. सुरुवातीस त्यांच्या वडिलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला तो दोन कारणांनी. एक म्हणजे हे क्षेत्र केवळ पुरूषांसाठी आहे हे आणि दुसरे कारण म्हणजे यात अतिशय धोका आहे हे.
 
मात्र पार्वती यांचा निर्धार ढळला नाही. त्यांनी वन्य हत्ती पकडून दाखविला आणि मग आपल्या वडिलांकडून प्रशंसा आणि या क्षेत्रातच काम करण्याची अनुमती मिळविली. तोवर थोरल्या बरुआ यांनी पकडून प्रशिक्षित केलेले अनेक हत्ती मंदिरांच्या बाहेर किंवा राजघराण्यात पोचले होते. तो मार्ग बंद झाला तरी पार्वती यांना आपल्या जीवनाचे नवे ध्येय गवसले. आपल्या वडिलांच्या निधनानंतर पार्वती एकट्याच्या बळावर माहूत म्हणून काम करू लागल्या. वनात फिरणारे हत्ती जेंव्हा भरकटतात तेंव्हा ते बिथरतात आणि वाटेत येणार्‍या सर्व गोष्टींची कमालीची नासधूस करतात. अशावेळी त्यांना मारले जाते. मात्र हत्तींचा जीव वाचावा; आणि मानवालाही अपाय होऊ नये म्हणून पार्वती अशा भरकटलेल्या कळपांना काबूत आणण्याचे काम करू लागल्या. पश्चिम बंगालपासून छत्तीसगढढपर्यंत अनेक ठिकाणी पार्वती यांना त्यासाठी पाचारण करण्यात येऊ लागले. 
 
काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे पन्नास हत्तीचा कळप रास्ता चुकला. त्या हत्तींना पकडणेही शक्य नव्हते. तेंव्हा सरकारने पार्वती यांना पाचारण केले. पार्वती आपल्या बरोबरच्या चार हत्तींना आणि काही प्रशिक्षित कर्मचार्‍यांना घेऊन आल्या आणि हळूहळू त्यांनी त्या भरकटलेल्या कळपाला योग्य रस्त्यावर आणले. याला जवळपास पंधरा दिवस लागले होते. पार्वती यांच्यावर ’क्वीन ऑफ एलिफन्टस’ नावाचा लघुपट आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाला; त्यांच्यावर पुस्तक देखील प्रकाशित झाले आणि पार्वती यांची ख्याती जगभरात पोचली.
 
भारतात मात्र त्या  टीकेच्या धनीही झाल्या. 2003 मध्ये छत्तीसगढमध्ये ओडिशातून शिरलेल्या हत्तीने विध्वंस चालविला होता. तीन जण मृत्युमुखीही पडले होते. उन्मत्त झालेल्या हत्तीला पकडण्यासाठी राज्य सरकारने बक्षीस जाहीर केले होते. अखेरीस पार्वती यांना बोलावण्यात आले. पण हत्ती इतका बिथरलेल्या अवस्थेत होता की त्याला गोळी मारूनच जायबंदी करावे लागले. काही दिवसांनी तो हत्ती मरण पावला तेंव्हा पार्वती यांच्यावर टीका झाली. चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. बरुआ यांनी हत्तीला गारद करण्यासाठी योजलेली पद्धत चुकीची होती असे आक्षेप प्राणिमित्रांकडून घेण्यात आले. पण त्याला जायबंदी केल्यानंतर आपण त्या हत्तीची किती सुश्रुषा केली याची कल्पना टीकाकारांना नाही असे प्रत्युत्तर पार्वती यांनी दिले. हत्तीचा जीव वाचविण्याचा ध्यास घेतलेल्या पार्वती हत्तीला मारणे हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडतील याची जाणीव न ठेवता झालेली ती टीका होती. 2005 मध्ये काझीरंगा अभयारण्याच्या शताब्दीनिमित्त हत्तीच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी हत्तींचा छळ करण्यात आला असे आरोप मनेका गांधी यांच्या प्राणी-हक्क संस्थेने केला तेंव्हाही पार्वती अस्वस्थ झाल्या होत्या.
 
अर्थात अशा टीकेने नाउमेद होणे हा पार्वती यांचा पिंड नव्हे. हत्तीसारख्या महाकाय प्राण्याशी त्या बोलतात; त्याला वेगवेगळे ‘आदेश’ त्या देऊ शकतात. हत्ती स्वभावतः प्रेमळ असतात. मात्र आपल्याकडून झालेली एक चूक आपल्या जीवावर बेतणारी ठरू शकते याची जाणीव पार्वती यांना आहे. जेंव्हा कधी आपण वनात जातो तेंव्हा ती आपली शेवटचीच खेप असू शकते या कल्पनेनेच आपण जातो असे पार्वती यांनी सांगितले होते. तरीही पार्वती यांना हत्तींचे भय वाटत नाही. वन्य हत्तींना पकडून, त्यांना प्रशिक्षण देण्यात त्या रमतात. त्यांचा विवाह बँकेतील एका कारकुनाशी झाला होता. पण आपल्या पत्नीची हत्तींची असलेली मैत्री त्याला पचणे शक्य नव्हते. अखेरीस ते विभक्त झाले; पण पार्वती यांनी हत्तींशी मैत्री तोडली नाही. ‘मला हत्तींच्या भावना समजतात म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात’ असे त्या म्हणतात आणि ते खरेच आहे. हत्तीच्या पाठीवर बसून त्यालच्या कानाला आपल्या पावलांच्या स्पर्शाने सूचना-निर्देश देणे, हत्तीला नियंत्रणात ठेवणे हे सोपे काम नाही. त्याला केवळ कौशल्य पुरेसे नाही. हत्तीला माहुताची भाषा कळायला हवी. आणि माहुताला हत्तीची. पार्वती दिवसभर त्यातच रममाण असतात. आताही जलपायगुडी येथे एका छोट्याशा राहुटीवजा घरात त्या राहतात. चैनीचे आयुष्य वाट्याला येऊनही त्यांनी हे साधे जीवन स्वेच्छेने स्वीकारले.
 
देशात जे अनेक हत्ती शिकारीस बळी न पडता वनांत सुखेनैव संचार करीत आहेत त्यात पार्वती यांचे योगदान अनन्यसाधारण महत्वाचे आहे. या कृश, किरकोळ चणीच्या महिलेसमोर हा महाकाय पशु विनम्र होऊ शकतो हे कल्पनातीत. सामान्य माणसाला त्याचे रहस्य समजणे अवघड. पण हे रहस्य बहुधा पार्वती आणि हत्ती यांच्यात जे काही निःशब्द गुज होते त्यात असावे. ते गुज गेली पाच दशके पार्वती बरुआ यांना याच क्षेत्रात काम करीत राहण्यासाठी बारा हत्तीचे बळ देत आले आहे. पद्मश्री सन्मानाने त्यांचा झालेला गौरव उचितच म्हटला पाहिजे!
 

Related Articles