तृणमूल नेत्याच्या अटकेसाठी महिलांची जोरदार निदर्शने   

कोलकाता :  तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहान आणि त्याच्या सहकार्‍यांना अटक करावी, अशी मागणी करत महिलांनी शनिवारी जोरदार निदर्शने केली. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पश्‍चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सेवाही बंद केली आहे. 
 
शहाजहान गेल्या महिन्यापासून बेपत्ता आहे. रेशन दुकानातील गैरव्यवहारप्रकरण ईडीच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता. तेव्हा पथकावर जमावाने हल्‍ला केला होता. यानंतर तो बेपत्ता आहे. त्याला त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महिलांनी लाठ्या आणि हातात खेटरांची माळ धरून सलग दुसर्‍या दिवशी निदर्शने केली. शहाजहान एक टोळी चालवत असून त्याने जबरदस्तीने जमीन बळकावली आहे. तसेच लैंगिक छळही केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महिलांच्या निदर्शनाविरोधात शहाजहान यांचे समर्थकही रस्त्यावर उतरले. त्यामुळे तणावात भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर गावात 144 कलम लागू केले असून परिसरातील इंटरनेट सेवा तातडीने बंद केली आहे. 
 

Related Articles