साहित्य संमेलनात विचार मंथन केंव्हा होणार   

अवतीभोवती : संदीप वाकचौरे

 
९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच झाले.साने गुरूजींच्या कर्मभूमीत म्हणजे अमळनेर येते हे साहित्य संमेलनाचे सूपही  वाजले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर समाजाचे उत्थान घडविण्याचे माध्यम आहे.अशावेळी साहित्याने समाजाच्या परिवर्तनासाठी भूमिका घेण्याची गरज आहे.साहित्य जर मस्तके घडवत असतील तर ती मस्तके अधिक सक्षम आणि विवेकी घडविणारे साहित्याची गरज वर्तमानात अधिक अधोरेखित होत आहे.वर्तमानात साहित्य संमेलनाचे आयोजन होत असताना त्या संमेलनाचे स्वरूप गेले काही वर्ष केवळ उत्सवी होते आहे. अशावेळी संमेलनाचे स्वरूपही बदलण्याची गरज आहे.अन्यथा नेहमीच येतो पावसाळा या न्यायाने संमेलनाकडे पाहिले जाण्याचा धोका आहे. येथील संमेलनाकडे रसिकांनी फिरवलेली पाठ अधिक चिंताजनक म्हणायला हवी.
 
साहित्याने समाजमन घडविण्याची जबाबदारी पार पाडायची असते.साहित्यिक जे लिहितात तो त्यांचा विचार समाजाला दिशा देण्यासाठी अधिक उपयोगी असतो.त्यामुळे साहित्याचा विचार अधिक महत्वाचा आहे.आज आपल्या समाजातील साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची वेळ आलेली आहे.राज्यातील ग्रंथालय ओस पडली आहेत.शासनाने मान्यता दिलेली असली तरी त्या ग्रंथालयांना वाचकांची प्रतिक्षा आहे. महाविद्यालयातील ग्रंथालयांना देखील तरूणाई प्रतिक्षा आहे. वाचणारी माणसं घटता आहेत हे वास्तव आहे.अशावेळी वाचनारी माणसं नसतील तर मस्तके तरी कशी घडतील ? आज आपल्या समाजात माणसांपेक्षा धर्म आणि जात व पंथ वरचढ ठरू लागले आहेत.माणसं विचाराने एकत्रित येण्याऐवजी जातीच्या नावाखाली एकत्रित येता आहेत.अशावेळी साहित्यांनी घडवलेला मस्तकांची गरज अधोरेखित होत जाते.आज समाजात छोटया छोटया कारणांनी माणसं मारली जात आहेत. माणसांचा जीव अधिक स्वस्त होत आहे. त्यामुळे माणसांचे मोल वाढविणारे आणि माणसाचं जीवन अधिक समृध्द करणारी व्यवस्था उभी करण्याची गरज अधोरेखित होते आहे.समाजात वाचकांचे प्रमाण कमी होते आहे हे वास्तव आहे.न वाचणारी पिढी जेव्हा समोर येते तेव्हा तो समाज रित्या मस्तकाचा असण्याची शक्यता आहे. समाजात जेव्हा हे रितेपण येईल तेव्हा समाजात संघर्षाचे बीजे आपोआप पेरली जाण्याची शक्यता अधिक आहे.समाजाचे रितेपण हे अधिक चिंताजनक आहे. 
 
समाजात लेखकांच्या विचारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.लेखकांना विचाराचे स्वातंत्र्य दिले गेले नाही तर वास्तवाचे दर्शन घडविणारे साहित्य प्रसुत कसे होणार हा खरा प्रश्न आहे.जोवर वास्तवाचे दर्शन घडत नाही तोवर प्रश्नाच्या जवळ जाण्याची शक्यता कमी होते.प्रश्नांचा विचार न करता आपला प्रवास सुरू ठेवला तर भविष्याच्या दृष्टीने त्यावर मात करण्याचे शहाणपण कसे निर्माण होणार ? साहित्यिकाचे स्वातंत्र्य स्वीकारले तर उद्याचे प्रश्न दूर करण्याची क्षमता त्यांच्या साहित्यातून निर्माण होईल.त्यामुळे साहित्य वाचकांच्या मनावर अधिराज्य करत असेल तर त्यातून समाजाचे प्रश्न निराकरणाची शक्ती निर्माण होण्यास मदत होते.आज साहित्य संमेलन ही साहित्यिकांची होण्याऐवजी राजकीय पक्षांची होता आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.साहित्यिक व राजकारणी यांच्यात दूरावा असता कामा नये.त्यांच्या नात्यात गोडवा असावा.संमेलनात त्यांचा वावर असावा पण तो किती याचा विचार करण्याची गरज आहे.राजकारणी हे देखील समाजाचे घटक आहेत त्यामुळे दूर सारता येणार नाही..पण त्यांचा वावर होताना मान्यवर साहित्यिकांकडे होणारे दुर्लक्ष कोणालाच परवडणारे असणार नाही.किमान संमेलनात तरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाकला जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
 
आपल्या समाजातही गेले काही वर्ष साहित्य आणि साहित्यिकांचे मोलही अलिकडे वाटेनासे झाले आहे.साहित्या बरोबर साहित्यिकांचे मोल देखील जाणून घेण्याची गरज आहे.जगाच्या पाठीवर जे जे देश प्रगत आहेत असे आपण मानतो आहोत त्या देशात लेखकांचे मोल अनन्य साधारण आहे.कधीकाळी ब्रिटीश म्हणत असे की,आम्ही हवे ते देऊ पण आम्ही आमचे शेक्सपिअर देणार नाहीत.तेथील सरकारने त्यांची निवासस्थाने जपून ठेवली आहेत. सरकारला लेखक देखील महत्वाचे वाटत आहेत. आपण आपल्या देशात लेखकांचे किती मोल जपतो आहोत हा खरा प्रश्न आहे. आपण साहित्यिकांना सन्मान देण्याची निंतात गरज आहे.कधीकाळी आपले राज्यकर्ते साहित्यिकांना सन्मा देत होते.साहित्यिकांच्या व्यासपीठावर न जाता श्रोंत्याच्या समोर खाली बसत होते.यापूर्वी यशवंतराव चव्हाण,विलासराव देशमुखांपासून अनेक राज्यकर्ते साहित्य संमेलनाला जात होते. उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनात माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख उपस्थित होते पण ते रसिकांमध्येच बसले होते. अनेक राज्यकर्ते उत्तम वाचक होते आणि आजही आहेत. यशवंतराव चव्हाण यांची साहित्याची जाणही मोठी होती. ते जाणीवपूर्वक साहित्यिकांशी संबंध ठेऊन होते.त्यांनी दिल्लीत गेल्यावर देखील त्यांनी अनेकदा साहित्यिकांसोबत संवाद सुरू ठेवला होता. त्यांनी या मातीतील बऱ्याच साहित्यिकांना उंचीवर नेण्याचे काम केले होते. लेखकाचे स्वातंत्र्य आणि योगदान मान्य करणारे नेतेही या राज्याने पाहिले. एकदा दुर्गाताई भागवत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या होत्या, खरेतर कामही ग्रंथालय चळवळीचेच होते. कक्षात जाताच मुख्यमंत्री जोशी पुढे आले आणि त्यांनी दूर्गाताईंचे वाकून नमस्कार केला तेव्हा कार्यालयात उपस्थितीत असलेल्या सचिवांना धक्का बसला. खरेतर यात मुख्यमंत्री जोशी यांच्याही मनाचा मोठेपणा होता.राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेले असताना देखील दूर्गाताईंचे योगदान लक्षात घेऊन सन्मान करणे हे महत्वाचे. अर्थात त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित सचिवांना बोलावून दूर्गाताईंनी मांडलेल्या विषयावर मार्ग काढण्याचे आदेश दिले. साहित्यिकांचे योगदान आणि निरपेक्षतेचा नेहमी राजसत्तेने आदर केला आहे.ती वाट चालण्याची गरज आहे. संमेलनानी केवळ महोत्सवी विचार आता सोडून देत समाज मन घडविण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. महोत्सवी उत्सव आता खूप होता आहेत किमान संमेलनाच्या माध्यमातून विचार मंथन घडण्याची गरज आहे.
 

Related Articles