इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवार आघाडीवर   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे पारडे जड दिसत आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने नॅशनल असेंब्लीच्या 265 पैकी 139 जागांचा निकाल जाहीर केला. त्यापैकी सर्वाधिक 55 जागा इम्रान समर्थक आमदारांनी पटकावल्या आहेत. 
 
इम्रान सध्या तुरुंगात आहेत. त्यांना विविध प्रकरणात 15,10 आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला ‘बॅट’ चिन्ह नाकारले होते. त्यामुळे त्यांचे समर्थक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उतरले होते.
 
इम्रान समर्थक आमदार 154 जागांवर आघाडीवर आहेत. बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान  पीपल्स पक्ष (पीपीपी) आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्ष प्रत्येकी 47 जागांवर आघाडीवर आहे. मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (एमक्यूूएम) आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्ष प्रत्येकी चार जागांवर आघाडीवर आहे.
 
नॅशनल असेंब्लीच्या 336 जागा आहेत. मात्र, 266 जागांसाठी मतदान घेण्यात येते. तर, 60 जागा महिलांसाठी आणि 10 अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी राखीव आहेत. एका उमेदवाराच्या निधनामुळे 265 जागांवर मतदान घेण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी 265 पैकी 133 जागा आवश्यक आहेत.  इम्रान समर्थक अपक्ष आमदारांनी आतापर्यंत 55 जागांवर विजय मिळविला आहे. शरीफ यांच्या पक्षाने 43 आणि बिलावल यांच्या पक्षाने 35 जागा जिंकल्या आहेत; तर अन्य जागांवर इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
 
सार्वत्रिक आणि चार प्रांतांतील अनुक्रमे सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये निवडणूक झाली. या चार प्रांतांत 12 हजार 695 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले होते. 
 
सिंधमध्ये पीपीने 45 जागा जिंकल्या. तर, इम्रान समर्थक चार उमेदवार विजयी झाले. जमात-ए-इस्लामी आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटने प्रत्येकी एक जागा जिंकली.खैबर पख्तुनख्वा विधानसभेच्या 50 मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला. ़इम्रान समर्थक 45 उमेदवार विजयी झाले. पंज़ाब प्रांतात शरीफ यांच्या पक्षाने 39 जागा जिंकल्या; तर इम्रान समर्थकांनी 33 जागांवर विजय मिळविला. बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत 6 जागांचे निकाल समोर आले. पीएमएल-एन आणि बलुचिस्तान नॅशनल पार्टी (बीएनपी) अवामी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. जेयूआय-एफने तीन, तर पीपीपीने एक जागा जिंकली.
 
पाकिस्तानात गुरुवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर, तातडीने मतमोजणीस सुरुवात झाली. मात्र, पहिला अधिकृत निकाल तब्बल 10 तासांनंतर शुक्रवारी पहाटे 3 वाजता जाहीर करण्यात आला. मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ, निकालात फेरफार अशा घडना घडत असल्याचे सांगितले जाते. 
 

Related Articles