नवाझ, मरियम, बिलावल विजयी   

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत लाहोर मतदारसंघातून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ विजयी झाले आहेत. तर, मनशेरा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराने त्यांचा  पराभव केला. त्यांची कन्या मरियम यांनी सुद्धा विजय संपादन केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो एका मतदारसंघातून विजयी झाले असून दुसर्‍या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे.  
 
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे नवाझ शरीफ सर्वेसर्वा आहेत. पक्षातर्फे सांगण्यात आले की, निवडणूक आयोगाकडून सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर नवाझ शरीफ विजयी सभेत भाषण करणार आहेत. आम्ही इम्रान समर्थक अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा प्राप्‍त करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
 
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ पक्षाने निवडणूक जिंकल्याचा दावा केला आहे. नवाझ यांची कन्या मरियम यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, इम्रान खान समर्थकांनी पक्षाचा विजय झाल्याची खोटी अफवा पसरविली आहे. वस्तुस्थिती तशी नाही. केंद्रात आणि पंजाबमध्ये आमचा पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सत्तेवर येणार आहे. काही जागांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. तोपर्यंत थांबा आणि वाट पाहा. आमचा विजय निश्‍चित आहेे. इक्श डार यांनी सांगितले की, 72 तास वाट पाहावी लागेल. अपक्ष आमदार आमच्यासोबत येतील आणि आम्ही सत्ता स्थापन करू. अनेकांनी पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. ते म्हणाले, पंजाब आणि केंद्रात शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. कारण येथील बहुतांश जागा आम्ही जिंकल्या आहेत. 
 
सार्वत्रिक निवडणुकीसाठी 336 जागांपैकी 266 मतदारसंघांत मतदान घेण्यात येणार होते. परंतु, बैजूर येथे एका उमेदवाराची हत्या झाल्याने 265 जागांसाठी मतदान झाले आहे. उर्वरित 70 जागा महिला आणि 10 अल्पसंख्याक उमेदवारांसाठी राखीव आहेत. 
 

हाफीजचा मुलगा पराभूत

 
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफीज सईद याचा मुलगा तालाह सईद याचा निवडणुकीत पराभव झाला आहे. तो लाहोर मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. शुक्रवारी मतमोजणीनंतर ही बाब उघड झाली. 
 

बिलावल लाहोरमधून हरले, अन्य मतदारसंघात विजय 

 
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी क्‍वांबेर शहादताकोट मतदारसंघातून 85 हजार 370 मतांनी विजय मिळविला आहे; परंतु लाहोर येथील मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आाहे. 

Related Articles