इस्रायलच्या विमानांकडून रफाह सीमेवर बाँबहल्‍ले   

जेरूसलेम : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी  गाझातील रफाह सीमा परिसरात बाँबहल्‍ले केले. त्यात 9 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्‍त केली असून असे हल्‍ले करू नका, असा इशारा दिला आहे. 
 
गाझा पट्टीत इस्रायलने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी आक्रमक हल्‍ले सुरू केले होते. त्यापूर्वी गाझाचा परिसर सोडावा, असा आदेश पॅलेस्टिनी नागरिकांना दिला होता. त्यानंतर एक तृतीयांश भागातून सुमारे 20 लाख 30 हजार नागरिकांनी पलायन केले होते. त्यांनी इजिप्‍तच्या रफाह सीमेवर आश्रय घेतला आहे. याच भागात इस्रायलने हवाई हल्‍ले केले आहेत. त्यात दोन इमारती कोसळून आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य भागातही तिसर्‍या हल्ल्यात चारजण ठार झाले आहेत. तेथे रक्‍ताचे थारोळे साचले होते. 
 
गाझातील हमास दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या हद्दीत हजारो रॉकेट टाकली होती. त्यानंतर इस्रायलने आक्रमक कारवाई सुरू केली. त्यात  आतापर्यंत 30 हजारांच्या आसपास पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्रायलचे 1 हजार 200 नागरिक ठार झाले असून दहशतवाद्यांनी 250 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. 
 
दरम्यान, इस्रायलने रफाह परिसरात रात्रभर बाँबहल्‍ले केले. त्याचा फटका निर्वासितांना बसला आहे. त्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तीव्र चिंता व्यक्‍त केली असून नागरिकांवर हल्‍ले करू नका, असा इशारा दिला आहे. 
 

Related Articles