हल्दवानीमध्ये हिंसाचारात दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी   

हल्दवानी, (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या हल्दवानी शहरातील बनभूलपुरा परिसरातील हिंसाचारात 2 दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पाहताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिली.
 
अवैधरीत्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि मदरसे तोडल्यानंतर गुरुवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.नैनितालचे जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रल्हाद मीना यांनी येथे काल संयुक्त पत्रकार परिषद घेताना गुरुवारी भडकलेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला याची पुष्टी केली.
 
मुख्य मंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल डेहराडून येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त पोलिस महासंचालक ए. पी. अंशुमन यांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था सुनिश्‍चित करण्यासाठी हल्दवानी येथे तळ ठोकण्याच्या सूचना दिल्या. बेकायदा बांधकाम हटवताना पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील मुख्य मंत्र्यांनी या वेळी दिले. जाळपोळ आणि दगडफेकीत सामील असलेल्या प्रत्येक दंगलखोराची ओळख पटली पाहिजे असे सांगतानाच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही धामी यांनी सांगितले.
 
मलिक के बगिचा येथील गुरुवारी मदरसे व मशिदींवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. तसेच, जमाव पोलिस स्टेशनवर चालून आला. पोलिसांवर हल्ला करण्यात आला. जाळपोळ करण्यात आली. तेव्हा पोलिसांना स्वसंरक्षणार्थ बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. 
 
दरम्यान, बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे अधिकार्‍यांनी काल सांगितले; तर तीन जण गंभीर जखमी आहेत. यापैकी, एकास गोळी लागली. अन्य दोघांच्या अंगावर गंभीर जखमा दिसत आहेत, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
 
पोलिस स्टेशन आणि पोलिस कर्मचार्‍यांवरील हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आली असून तीन एफआयआर नोंदवण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
 

Related Articles