हमी भाव, योजनांतून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट   

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विश्‍वास 

 
नवी दिल्‍ली : शेतकर्‍यांना गरिबीतून बाहेर काढणे आवश्यक असून त्यांच्या शेेतमालाला चांगला दरही देण्याची गरज आहे. सरकारकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. विविध योजना प्रभावीपणे राबविल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी व्यक्‍त केला. आयसीएआर -भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित 62 व्या परिषदेत त्या पुसा येथे बोलत होत्या.  शेतमालाला किमान हमी भाव द्यावा, अशी मागणी करून हजारो शेतकर्‍यांनी दिल्‍ली-एनसीआर परिसरात आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुर्मू यांंनी शेती आणि शेतकर्‍यांबाबत व्यक्‍त केलेले मत महत्त्वाचे ठरले आहे.
 
मुर्मू म्हणाल्या, ‘शेतकरी केवळ अन्नदाता नसून जीवनदाता आहे. शेतकर्‍यांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण सरकारला आहे. अनेक शेतकरी गरिबीत जीवन कंठत असून, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. तसेच त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. 2047 पर्यंत देश विकसित राष्ट्र झाल्याचे शेतकरी पाहतील, असा दृढ विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. आधुनिक शेती, जलसिंचन सुविधा आणि पीक विमा योजना, मातीचे आरोग्य कार्ड आणि किसान संपदा अशा योजनांना अधिक गती दिल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल. 

Related Articles