काशी-विश्वनाथ मंदिरात ५० पुजारी पदांची भरती   

वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिरासाठी 50 पुजारी पदांंची भरती केली जाणार आहे. या भरतीत मुख्य पुजारी, कनिष्ठ पुजारी आणि सहायक पुजारी पदेही भरण्यात येणार आहेत. काशी विश्वनाथ मंदिर न्यासाच्या 105 व्या बैठकीत 41 वर्षांनतर पुजारी सेवा नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीवर बैठकीत एकमताने सहमती झाली. 
 
अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी हजारो जणांमधून एकाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता काशी विश्वनाथ मंदिरात पुजार्‍यांची भरती होणार आहे. मुख्य पुजारी पदासाठी 90 हजार, कनिष्ठ पुजारी पदासाठी 80 हजार आणि सहायक पुजारी पदासाठी 65 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंदिर पुजारी नियमावलीसह जिल्ह्यातील संस्कृत भाषेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, संस्कृत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मंदिर न्यासकडून पोशाख आणि पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णूपालक मिश्रा यांनी गतबैठकीतील निर्णयांचे आणि त्यांच्या सद्यस्थितीचे वाचन करुन दाखवले. 
 

Related Articles