जेवढे समन्स; तेवढ्या शाळा उघडणार : केजरीवाल   

नवी दिल्ली : मुलांना दर्जेदार शिक्षण दिल्यास एका पिढीत गरिबी दूर होईल.  दर्जेदार शिक्षण देणे हे आप सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तपास यंत्रणांनी आतापर्यंत मला जेवढी समन्स दिली, तेवढ्या शाळा मी उघडणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
 
मयूर विहारमधील सरकारी शाळेच्या इमारतीची पायाभरणी केजरीवाल यांनी केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, मुलांना दर्जेदार शिक्षण दिल्यास एका पिढीत गरिबी दूर होईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्याने नव्या शाळा उघडत आहे. दिल्लीमध्ये आप सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही अनेक उत्कृष्ट शाळा उघडल्या आहेत. अलीकडेच बुरारी, रोहिणी आणि पालमसह अनेक नवीन शाळांचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामध्ये दीड लाख मुलांना शिक्षण मिळेल.
 
नवीन शाळांमध्ये प्रयोगशाळा, लायब्ररी आणि अ‍ॅक्टिव्हिटी रूमसह सर्वोत्तम पायाभूत सुविधा असतील. सर्व मुलांना शिक्षण देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. दरम्यान, दिल्लीला अर्धे राज्य मानून केंद्राने आप सरकारच्या कारभारात अनेक अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या सरकारने प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचवण्याची योजना मांडली होती; पण केंद्राने त्याला परवानगी दिली. पण आम्ही उद्यापासून पंजाबमधील प्रत्येक घरापर्यंत रेशन पोहोचवणार आहोत. पंजाबमध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर ती दिल्लीतही लागू केली जाऊ शकते आणि केंद्र ती रोखू शकणार नाही.दिल्लीतील जनतेला मोफत वीज, आरोग्य सेवा आणि शिक्षण दिले असतानाही  भाजपने आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले आहे, अशी खंतही केजरीवाल यांनी व्यक्त केली. 
 

Related Articles