दिग्गज कंपनीकडून नोकरकपात   

वृत्तवेध

 
सध्या विविध क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचे संकट आहे. आता आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठी नोकरकपात करण्यात येणार आहे. युपीएस ही जगातील सर्वात मोठी पार्सल डिलिव्हरी कंपनी हजारो कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची आहे. हे वृत्त एकाच कंपनीबद्दल भाष्य करत असले तरी नोकरकपातीची वावटळ कशी घोंघावत आहे, हे समजू शकते.
 
युनायटेड पार्सल सर्व्हिस (युपीएस) या जगातील सर्वात मोठ्या पार्सल वितरण कंपनीने बारा हजार कामगारांना कामावरून कमी करण्याची तयारी केली आहे. याशिवाय कंपनी आपल्या ‘कोयोट’ या ट्रक फ्रेट ब्रोकरेज व्यवसायासाठीही कठोर निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. ‘कोयोट’ ट्रकलोड फ्रेट ब्रोकरेज व्यवसायासाठी धोरणात्मक पर्यायांचे पुनरावलोकन करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा खाली आल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
 
कंपनीतर्फे बारा हजार कर्मचार्‍यांना कमी करण्याच्या बातमीमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये खळबळ माजली आहे.गेल्या काही महिन्यात नाईकी तसेच गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांनीही नोकरकपात केली. सध्या नोकरकपातीची टांगती तलवार अनेक क्षेत्रांवर आहे. दरम्यान, नोकरकपातीच्या बातमीनंतर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये युपीएसच्या शेअर्समध्ये 6.3 टक्कयांची तीव्र घसरण झाली. मुख्य कार्यकारी कॅरोल टोम यांनी सांगितले की मागील वर्ष कठीण आणि निराशाजनक होते. युपीएसने त्यांच्या सर्व व्यवसाय विभागांमध्ये कमी नफा मिळवला. युपीएस कंपनीने आता खर्चात एक अब्ज डॉलर कपात करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कंपनीचा पूर्ण वर्षाचा महसूल 92 अब्ज डॉलर ते 94.5 अब्ज डॉलर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ‘सीएफओ’ ब्रायन न्यूमन यांनी सांगितले की टीमस्टर्स युनियनसोबतच्या नवीन करारामुळे त्याच्या मजुरीचा खर्च वाढत आहे. याशिवाय कंपनीच्या सरासरी ऑर्डर्सही कमी होत आहेत. 
 
कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन कमी होण्याची अपेक्षा आहे. युपीएसचा आंतरराष्ट्रीय हवाई-आधारित विभाग आणि ट्रक व्यवसाय चौथ्या तिमाहीमध्ये अनुक्रमे 6.9 टक्के आणि 7.3 टक्के घसरला. कंपनीचा तिमाही महसूल एका वर्षापूर्वी 27 अब्ज डॉलरवरून 24.9 अब्ज डॉलरवर घसरला. कंपनीचा नफाही गेल्या वर्षीच्या प्रति शेअर 3.62 डॉलरवरून 2.47 डॉलर प्रति शेअरवर घसरला आहे.
 

Related Articles