विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा : उपमुख्यमंत्री पवार   

पुणे : विमानाने प्रवास करणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल, अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
 
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्‍त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक पी.के. दत्ता, विमानतळ संचालक संतोष डोके व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नवीन टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे. देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुण्यात येत असतात. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फेर्‍यांमध्ये वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे विमान प्रवास क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पुण्यातून देशातंर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे उपलब्ध झाली असून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करण्यात आला आहे. नव्या टर्मिनलमुळे प्रवासी, तसेच व्यावसायिक सुविधा वाढणार आहे. विमानतळ परिसरात आकर्षक इनडोअर प्लँट्स लावावे. राज्यातील आणि पुण्यातील महत्त्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित करावी. स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. त्यांनी एअरोब्रिज, विमान पार्किंग, खाजगी विमान पार्किंग, चेक इन काऊंटर, व्हीआयपी लाऊंज, बॅगेज, हँडलिंगसह इतर सुविधांची पाहणी केली.
 
विमानतळ संचालक डोके यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आगमन-निर्गमन व्यवस्था, वाहनांची पार्किंग, बॅगेज हॅन्डलिंग, सिस्टिम लाऊंज व अन्य सुविधांची आणि भविष्यात करण्यात येणार्‍या सुविधा, तसेच जुन्या विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली.
 

Related Articles