आरटीओचा कोट्यवधीचा महसूल बुडाला   

सर्व्हर बंद; कामाचा खोळंबा

 
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश कामे ‘सारथी’ आणि ‘वाहन’या प्रणालीवर चालतात. मात्र मागील आठवडाभरापासून प्रणालीचा सर्व्हर बंद पडत आहे.मागील दोन दिवसांपासून तर सर्व्हर पूर्ण वेळ बंद आहे. त्यामुळे कार्यालयातील बहुतांश कामकाजाचा खोळंबा झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून कार्यालाला विविध कामातून मिळणारा कोट्यवधी रूपयांचा मसूल बुडाला आहे.
 
शिकाऊ परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेली सारथीची प्रणाली गेले दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे गुरूवारी आणि शुक्रवारी वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. आरटीओ कार्यालयातील परवाना सेवा बंद झाल्याने बऱ्याच जणांच्या नियोजित अपॉईंटमेट पुढे ढकलाव्या लागल्या. सुट्टी टाकून परवाना घेण्यासाठी गेलेल्या वाहन चालकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. विशेष म्हणजे पुण्यासह संपूर्ण राज्यात सर्व्हर बंदचा फटका बसत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व सेवा आता फेसलेस करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे वाहनांच्या कागदपत्रां संदर्भातील कामकाज ‘सारथी’ आणि ‘वाहन’ या प्रणालीवर चालते. मात्र, ही प्रणालीचा सर्व्हर बंद झाल्यामुळे कच्चा परवान्याची कामे रखडली. तसेच आंतरराष्ट्रीय वाहन परवाना, वाहनांची नोंदणी, वाहनांचे हस्तांतर, वाहनांशी संबंधित कागदपत्रात बदल आदी कामे थांबली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहनाविषयींच्या कामासाठी पुणे आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. चकरा मारूनही सर्व्हर नसल्याने वाहन चालकांना प्रतिक्षा करून कामाविनाच परतावे लागत आहे.
 
सर्व्हर कार्यान्वित नसल्याने आरटीओ कार्यालयातील इतर कामांची गती मंदावली आहे. अधून मधून वाहन प्रणाली चालत आहे मात्र त्यावर ताण आला की, त्याही प्रणालीचा सर्व्हर बंद पडत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील कामांना विलंब होत आहेत. सर्व्हर कधी सुरू होणार याबाबत विचार केल्यास वरूनच सर्व्हर बंद असल्याचे उत्तर आरटीओ कार्यालयातील कर्मचारी देत आहेत. त्यामुळे सर्व्हर कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाच्या मनातही गोंधळ आहे.
 

वाहन चालकांची गैरसोय

 
सारथी आणि वाहन प्रणालीचा सर्व्हर मागील आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून बंद आहे. त्यामुळे कार्यालयातील बहुतांश कामे थांबली आहेत. वाहन चालकांनाही वाहनाविषयीच्या कामासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. एकीकडे काम थांबले आहे, तर दुसरीकडे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. यातून आरटीओचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. आरटीओ कार्यालयात सेवा देणार्‍यांचेही कामी थांबली आहेत.
 
 - एकनाथ ढोले, सरचिटणीस, ऑल इंडिया ट्रान्सपार्ट असोसिएशन महाराष्ट राज्य. 
 

Related Articles