ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला   

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा खोपडे चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुला जवळ असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती. परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
 

निखिल वागळे यांची पुण्यात आज 'निर्भय बनो' सभा

 
पुण्यातील दांडेकर पुलावरील राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे. त्यांच्याबरोबर ऍड. असीम सरोदे आणि समाजवादी नेते नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार आहेत. मात्र, वागळे यांची सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यामुळे त्यांची ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता.

 

हल्ल्यानंतरही वागळे सभास्थळी

 
गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहे. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. निखिल वागळे यांची मंचावर आगमन होताच फुले शाहू आंबेडकरांच्या घोषणांनी सभास्थळ घुमले. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला.

 

Related Articles