रायरेश्वरावर ग्रामस्थ आणि कर्मचार्‍यांच्या पुढाकाराने पोहोचले रोहित्र   

भोर (वार्ताहर) : भोर तालुक्यातील ऐतिहासिक रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व कर्मचार्‍यांनी मोठ्या कष्टाने 750 किलो वजनाचे रोहित्र वाहून नेण्याची अवघड किमया गुरुवारी केली आहे. गेल्या आठवड्यात रोहित्र नादुरूस्त झाल्यामुळे पठारावरील पवारवस्ती आणि वरची धानवलीतील कुटुंबाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. 
 
2019 मध्ये रायरेश्वर पठार विजेच्या प्रकाशाने उजळले. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पठारावरील जमिनीतील पाण्याची आर्द्रता कमी झाल्याने रोहित्र नादुरूस्त झाल्याचे महावितरणने सांगितले. नवीन रोहित्र वर नेण्यासाठी आठ किलोमीटरच्या अंतरासाठी मनुष्यबळाचा वापर करण्याचे मोठे आव्हान महावितरण समोर उभे होते. ठेकेदाराच्या कामगारांनी पठाराची वाट आणि भौगोलिक परिस्थिती पाहून पळ काढला. त्यामुळे रोहित्र वर नेण्याचा प्रश्न अवघड झाला होता. पठारावर जाण्यासाठी पाऊलवाट अतिशय निमुळती, घसरडी, वळणावळणाची आहे. 
 
अनेक ठिकाणी गवत, झुडपे वाढली आहेत. तर लोखंडी शिडी काही भागात अति उताराची व अरुंद आहे. खाली खूप खोल दरी आहे. अशा परिस्थितीत पठारावर एकट्याने चढणे देखील अवघड जाते. पठारावर जाण्यासाठी पाऊलवाट व लोखंडी शिडीशिवाय मार्ग नाही. परंतु, सलग दोन दिवस मोहीम राबवून रोहित्र वर नेण्यात आले. त्यासाठी रस्सी, पाईप व लाकडी वासे वापरून डोली सारखा प्रकार केला.
 
तीनशे फूट कातळ कडा लोखंडी शिडीने पार केल्यावर दुसर्‍या दिवशी पवारवाडीला रोहित्र नेले. कनिष्ठ अभियंता सागर पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आव्हान स्वीकारून रोहित्र वर नेऊन वीजपुरवठा सुरू केल्यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.रोहित्र वर नेण्याचे काम अतिशय अवघड व आव्हानात्मक होते. ग्रामस्थ व कर्मचार्‍यांनी दोन दिवस मोहीम राबवून हे काम पूर्ण केले.
 

सागर पवार, कनिष्ठ अभियंता.

 

Related Articles