मोदी यांच्याकडून मनमोहन सिंग यांची प्रशंसा   

नवी दिल्ली : राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या सदस्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सभागृह आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा मनमोहन सिंग यांच्या योगदानाचीही चर्चा नक्कीच होईल. त्यांंच्या अनुभवाचा फायदा देशाला आणि नव्या पिढ्यांना होईल, असेही मोदी यांनी सांगितले. 
 
राज्यसभेतून निवृत्त होणार्‍या 56 खासदारांना गुरूवारी सभागृहात निरोप देण्यात आला. लोकशाही बळकट करण्यासाठी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकसभा दर 5 वर्षांनी नव्याने स्थापन होते. मात्र राज्यसभा दर 2 वर्षांनी नवीन उर्जा, उमंग, उत्साह निर्माण करते. निवृत्त सदस्यांच्या आठवणी पुढील पिढीसाठी अमूल्य वारसा असतो. मला सातत्याने मनमोहन सिंग यांची मला आठवण येते.   ते सहा वेळा या सभागृहाचे सदस्य राहिले आहेत आणि त्यांनी आपल्या बहुमोल विचारांनी या सभागृहासाठी मोठे योगदान दिले आहे. वैचारिक मतभेद कधी वादविवाद हे अल्पकालीन असते. परंतु एवढा दीर्घकाळ ज्यारितीने त्यांनी सभागृहासाठी आणि देशासाठी मार्गदर्शन केले, त्याचा देशाला आणि नव्या पिढ्यांना नक्कीच फायदा होईल. 
 
सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात मतदानासाठी येणे हे सदस्याच्या कर्तव्याप्रति समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. मला विश्वास आहे की ते लोकशाहीला बळ देण्यासाठी आले आहेत. सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर ऑक्टोबर 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. 1991, 1995, 2001, 2007, 2013 आणि 2019 या सहा टर्म त्यांनी राज्यसभेवर काम केले. ते सध्या राजस्तानमधील राज्य परिषदेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 रोजी संपत आहे. 

Related Articles