राज्यातील ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार : उद्योगमंत्री सामंत   

पुणे : उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून, सुमारे 4 हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमांतून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण, तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थांसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अप्पर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अप्पर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.
 
सामंत म्हणाले, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून, नवीन उद्योगासाठी ही चांगली संधी आहे. पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारचा उद्योजकांचा ‘मेळा’ प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल. त्यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल. विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगांमध्ये वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
यावेळी डॉ. हर्षदीप कांबळे, दीपेंद्रसिंह कुशवाह यांची ही भाषणे झाली. सामंत यांच्या हस्ते एक्सपोर्ट पॉलिसी 2023 या पुस्तिकेचे विमोचन, तसेच निर्यातभिमुख उत्पादनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दालनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

Related Articles