पवार पेचात (अग्रलेख)   

कायदेशीर लढाईपेक्षाही निवडणुकीची लढाई शरद पवार यांच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. प्रतिस्पर्धी गटाची प्रचार यंत्रणा व साधन सामग्री अफाट आहे. त्यांच्या आव्हानाला शरद पवार कसे तोंड देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाली. त्या पैकी अजित पवार यांच्या नेतृत्वा खालील गट खरा राजकीय पक्ष असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. पक्षाच्या नावाबरोबरच घड्याळ हे चिन्हही अजित पवार गटास मिळाले. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची व त्यांच्या गटाची या मुळे पंचाईत झाली आहे. त्यांना आपल्या गटासाठी किंवा पक्षासाठी तीन  नावे  सुचवण्यास निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्या नुसार सादर केलेल्या नावांपैकी ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद्चंद्र पवार’ हे नाव निवडणूक आयोगाने मंजूर केले आहे. मराठीत हे नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद्चंद्र पवार’ असे होऊ शकेल. या पक्षाचे चिन्ह मात्र अद्याप ठरलेले नाही. गेल्या वर्षी पक्ष फुटल्यापासून कोणता गट खरा पक्ष हा प्रश्न चर्चेत होता. निवडणूक आयोगापुढे तो गेला. त्याच प्रमाणे आमदार फुटणे किंवा पक्षांतर हा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांपुढे आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. शरद पवार यांच्या गटाच्या बाबतीत जे निर्णय झाले आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाचे असावेत असे दिसत आहे. राज्यसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीपुरते हे नाव असावे असा निष्कर्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून काढता येतो. लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर उभी आहे. त्या पूर्वी नाव व चिन्हाचा सोक्षमोक्ष लागणे शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
 

फेर बांधणीचे आव्हान

 
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे हे निश्चित. त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर  उतरून निवडणूक आयोगाचा निषेधही केला आहे. ‘केंद्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तो चुकीचा आहे. जे पक्ष भाजपला पाठिंबा देत नाहीत त्यांच्यात फूट पाडण्याचा किंवा ते पक्ष नष्ट करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे’ असा आरोप शरद पवार यांच्या गटातील पुण्यातील एका नेत्याने नुकताच केला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे त्यांच्या गटाने ठरवले आहे. मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये मोठा व महत्त्वाचा कोण हा मुद्दा ते  न्यायालयात मांडणार आहेत. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षावरील नियंत्रणाचा निर्णय घेऊ शकत नाहीत असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, ते लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. आपण अन्य योग्य व्यासपीठांकडे दाद मागणार असल्याचे शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले आहे. अजित पवार गटात अस्वस्थता आहे आणि त्यांच्यापैकी अनेक नेते  परत येऊ शकतात असा दावा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिल देशमुख यांनी केला आहे. अर्थात हा सत्तेचा खेळ आहे. ज्या गटाकडे सत्ता असेल किंवा मिळू शकेल त्या गटाकडे नेते व कार्यकर्त्यांचा ओघ जातो असे आतापर्यंत दिसले आहे. लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. त्या आधी पक्षाची फेरबांधणी करण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्या पुढे आहे. आपला पक्ष राज्यातील जनतेपर्यंत कमी काळात पोहोचवण्याचेही आव्हान त्यांच्या समोर आहे. त्या साठी त्यांना राज्यभर दौरा करावा लागेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची आशा त्यांच्या गटास वाटत आहे. तशी ती तयार झाली तरी तिचे मतांमध्ये व नंतर जागांमध्ये रूपांतर होणे जास्त महत्त्वाचे आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह या गटाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत करण्याचा विडा अजित पवार यांनी उचलला आहे. त्यास काटशह देणे सोपे नाही. कारण सत्ता आणि पैशाचे जवळचे नाते असते. सध्या शरद पवार यांच्याकडे सत्ता नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक ज्येष्ठ अनुभवी व मुरब्बी राजकीय नेते आहेत. त्यांनी या आधीही अनेक वादळांचा व संकटांचा सामना केला आहे. मात्र या वेळचे आव्हान त्यांचे शिष्य व पुतणे यांनीच त्यांच्यापुढे उभे केले आहे. त्यामुळे शरद पवार सध्या तरी पेचात सापडले आहेत असे जाणवते.
 

Related Articles