अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : स्वातंत्र्यसेनानी असफ अली   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
 
स्वातंत्र्यसेनानी असफ अली हे विद्वान, वकील, लेखक, संगीत व कला याचे चोखंदळ रसिक आणि परम राष्ट्रवादी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हिंदू व मुस्लिम संस्कृती, तसेच भारतीय व पाश्चात्य संस्कृतीचा अपूर्व असा संगम झाला होता. कडवे राष्ट्रवादी असलेले असफ अली यांच्यापुढे रवींद्रनाथ टागोर यांचा आदर्श होता. ते टागोरांचे प्रचंड चाहते होते.
 
1914 मध्ये ते इंग्लंडमध्ये प्रिव्ही कौन्सिल ब्रीफवर इंग्लंडला होते त्यावेळी लंडनहून ताज नावाच्या उर्दू साहित्य मासिकाचे प्रकाशन करीत असत. या मासिकांमधून रवींद्रनाथ टागोरांच्या काही कवितांचा त्यांनी उर्दूमध्ये अनुवाद केला होता. त्याच काळात भारतीय रहिवाशांनी आयोजित केलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वागत समारंभात त्यांची ओळख झाली. त्यांची आजी काश्मिरी हिंदू होती. असफ अली यांनी भगवद् गीता व महाभारत यांचे उर्दूत अनुवाद केले. त्यामुळे त्यांचे अनेक मित्र त्यांना ’पंडित’ असफ अली असे म्हणत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एक श्रेष्ठ मानवतावादी होते.
 
असफ अली दीड वर्षाचे असतानाच त्यांचे वडील गेले. असफ अलींचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. कुराण व उर्दू भाषेचे धडे त्यांनी घरीच घेतले. सी.एफ. अ‍ॅन्ड्र्यूजसारख्या राष्ट्रवादी विचार शिकवणार्‍या प्राध्यापकांमुळे त्यांचा राष्ट्रवादी विचार पक्का झाला. पुढे ते कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी 1909 मध्ये इंग्लंडला गेले. तेथेच त्यांची इंडिया हाऊसमध्ये सावरकर, बिपिनचंद्र पाल, पुढे कर्झन वायलीला मारणारे धिंग्रा यांच्याशी ओळख झाली. सावरकरांच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांना बळ मिळाले. 1912 मध्ये असफ अली बॅरिस्टर झाले व भारतात परत आले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी मोकळ्या वेळेचा उपयोग ऑस्कर वाईल्ड, इब्सेन, टॉलस्टॉय, तर्जेनेव्ह, डोस्टोवस्की, मॅक्झिम गॉर्की, बालझॅक, यांचे साहित्य वाचण्यासाठी केला. त्यांना बर्नार्ड शॉ यांच्या वाङ्मयाची गोडी लागली. 1914 मध्ये ते पुन्हा इंग्लंडला गेले; पण 1914 मध्येच ओझोमन साम्राज्यावर ब्रिटिशांनी केलेल्या हल्ल्यासाठी त्यांनी तुर्कीच्या बाजूने समर्थन केले आणि प्रिव्ही कौन्सिलचा राजीनामा देऊन डिसेंबर 1914 मध्ये परत माघारी भारतात परतले. त्यावेळेपासून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत झोकून देऊन स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. भारतात परतल्यावर त्यांनी राष्ट्रवादी चळवळीत भाग घेतला. असफ अली यांच्यावर लोकमान्य टिळक व डॉक्टर अ‍ॅनी बेझंट यांच्या स्फूर्तीदायक वक्तृत्वाचा प्रभाव पडला. भारत पारतंत्र्यात आहे, ही गोष्ट असह्य असून ती पुढे सहन करणे शक्य नाही, असे प्रत्येक भारतीयाला वाटले पाहिजे या डॉक्टर अ‍ॅनी बेझंट यांच्या घोषणेने असफ अली खूपच प्रभावी झाले. आणि त्यांनी इंडिया होमरूलची शाखा दिल्लीमध्ये उघडण्यासाठी पुढाकार घेतला.
 
1917 मध्ये भारतमंत्री इ.एस. माँटेग्यू यांना दिल्ली येथील एका स्वयंभू स्वागत समितीने जे मानपत्र दिले, त्याचा मसुदा तयार करण्याचे काम असफ अली यांच्यावर सोपविण्यात आले होते. दिल्लीत अनेक साम्राज्ये उदयास आली, तशीच दिल्लीत अनेक साम्राज्ये गेली. असफ अलींच्या या सडेतोडपणामुळे इंग्रज सरकारच्या गुप्तहेर खात्याचे त्यांच्याकडे लक्ष गेले. सरकारला दिलेल्या अहवालात गुप्तहेर खात्याने म्हंटले, असफ अलींच्या वक्तृत्वात लोकमान्य टिळकांसारखा जहरीपणा नसला, तरी ते एक लक्षात घेण्याजोगे व्यक्तिमत्त्व आहेत. 
 
लोकमान्य टिळक व हसरत मोहानी यांच्यानंतर खूप प्रसिद्धी मिळालेला भारतातील हा तिसरा राजकीय खटला होता असे बर्‍याच जणांनी लिहून ठेवले आहे. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर असफ अली, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. असहकार चळवळ, तसेच सविनय कायदेभंग चळवळ यात त्यांचा सहभाग होता.
 
या काळात ते देशातील सर्वात प्रतिष्ठित वकील म्हणून प्रसिद्ध पावले. 8 एप्रिल 1929 रोजी मध्यवर्ती असेंब्लीच्या हॉलमध्ये बॉम्ब फेकल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांचा बचाव न्यायालयात त्यांनी आपल्या कायदेशीर बुद्धीने केला होता. सन 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. त्यात प्रारंभीच्या सत्याग्रहीमध्ये 1942 भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यानंतर त्यांना अहमदनगर किल्ला तुरुंगात ठेवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरूही तिथे होते. जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगात असताना 1944 मध्ये ’द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी लाभलेल्या असफ अली यांच्या सहवासाचा पंडितजींनी प्रस्तावनेत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. असफ अली यांना अहमदनगर व नंतर गुरुदासपूर येथे असा एकूण चार वर्षे कारावास भोगावा लागला. तुरुंगात असताना असफ अलींनी बरेच वाङ्मयीन काम केले. त्यांनी कविता केल्या, लघुकथा लिहिल्या व टीकात्मक लेख लिहिले. रवींद्रनाथ टागोरांच्या ’किंग ऑफ द डार्क चेंबर’ या नाटकाचा उर्दू अनुवाद केला.
 
1945 मध्ये तब्येतीच्या कारणास्तव त्यांची गुरुदासपूर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार वर्षाच्या कारावासातून सुटका झाल्यावर असफ अली 24 ऑगस्ट 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असफ अली यांची भारताचे अमेरिकेतील पहिले राजदूत म्हणून नेमणूक झाली. ही जबाबदारी पार पडत असताना ते युनोतील भारतीय शिष्टमंडळाचेही सभासद होते. एप्रिल 1948 मध्ये असफ अली भारतात परत आले आणि त्यांची ओरिसाचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली. ही जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी ओरिसातील भ्रष्टाचार व विध्वंस यांना आळा घालण्याचे काम हाती घेतले.
 

Related Articles