मोबाईल फोन स्वस्त होणार   

वृत्तवेध
 
गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल फोन्सच्या किमती चढ्या राहिल्या आहेत. मोबाईल फोन ही काल-परवापर्यंत औत्सुक्याची बाब होती. उंची मोबाईल हे स्टेटस सिंबॉल मानले जाऊ लागले होते. मात्र सेवेचे दर कमी झाल्यानंतर अत्यंत सामान्य व्यक्तीपासून सर्वांच्याच हाती मोबाईल फोन आले आणि पाहता पाहता मोबाईल ही गरजेची बाब बनली. त्यामुळे त्याच्या किमतीमध्ये वाढ होणे ही सामान्यजनांसाठी चिंतेची बाब ठरते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोबाईल फोन्सच्या उत्पादनासाठी लागणार्‍या आयात मालाच्या शुल्कात पाच टक्के कपात केली आहे. त्यामुळे मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत.
 
वास्तविक, अलीकडेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींद्वारे किमतीतील दर कमी करण्याचा निर्णय होऊ शकला असता. मात्र, अंदाजपत्रकाची वाट न पाहता मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या प्रमुख घटकांवरील आयात शुल्क कमी केले. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या वस्तूंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आले आहे. मोबाईल फोनसाठी लागणार्‍या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम होऊन मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल फोन विकत घेणे अनेकांसाठी कमी त्रासाची बाब ठरणार आहे.केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने सीमाशुल्क यांच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार मोबाईल फोन तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या घटकांवर कमी आयात शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे ताजी दरकपात होत आहे.
 

Related Articles