केवळ तीन जागांसाठीच ‘इंडिया’ सोबत चर्चा : उमर   

जम्मू : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीसोबत जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील केवळ तीन जागांबाबत चर्चा केली जाईल, असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या. याच तीन जागा ‘इंडिया’साठी सोडल्या जातील, असेही ते म्हणाले.
 
आगामी लोकसभा निवडणुकासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये  विधानसभा निवडणुका घेण्याचे धाडस भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये नाही, असेही उमर म्हणाले.आतापर्यंत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस चर्चेसाठी तयार आहे. मात्र, आम्ही पुढाकार घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. येत्या काही दिवसांत चर्चा होईल. पण, केवळ तीन जागांवर, असेही उमर म्हणाले.  या तिनीही जागा सध्या भाजपकडे आहेत. यात जम्मू, उधमपूर आणि लडाख लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उमर यांच्या नॅशनल कॉन्फरन्सव्यतिरिक्त मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षदेखील ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे. 
 
नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू, उधमपूर आणि लडाख मतदारसंघात यापूर्वी निवडणूक लढवली आहे. जम्मू आणि लडाखमध्ये आम्ही विजयही मिळविला आहे. भाजपकडे असलेल्या जागा परत मिळविण्याच्यादृष्टीने आघाडीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
 

Related Articles