सामूहिक धर्मांतर प्रकरणी ख्रिश्‍चन धर्मगुरूसह दहा जणांना अटक   

बाराबंकी : बाराबंकी जिल्ह्यातील कथित सामूहिक धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी   एका ख्रिश्‍चन धर्मगुरूसह दहा जणांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी बुधवारी सांगितले की, सोमवारी देवा पोलीस स्टेशन हद्दीतील चक्रर मजरे रेंदुआ पल्हारी गावात एका चर्चमध्ये बेकायदेशीरपणे 300 नागरिकांचे धर्मांतर केल्याच्या आरोपावरून 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली आहे, तर सहा जणांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कथित ख्रिश्‍चन धर्मगुरू फादर डॉमिनिक पिंटो (रा. मंगळुरू, कर्नाटक), सरजू प्रसाद गौतम, पवन कुमार, सूरज गौतम, घनश्याम गौतम, सुरेंद्र पासवान, राहुल राजपूत, रामजनम रावत, धर्मेंद्र कोरी आणि सुनील पासी यांचा समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून 30 बायबल ग्रंथ, 30 धार्मिक ग्रंथ, सात विविध पुस्तके, सहा रजिस्टर, पाच डायरी आणि नऊ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींच्या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या असून, अवैध धर्मांतराच्या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सी. एन. सिन्हा म्हणाले की, ही टोळी अयोध्येसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी किती जणांचे धर्मांतर झाले आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत. 

Related Articles