बलुचिस्तानात दुहेरी बॉम्बस्फोटात २५ ठार   

कराची : पाकिस्तानात आज (गुरूवारी) सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र, एक दिवस आधी बुधवारी पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांबाहेर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यामध्ये किमान 25 जण ठार झाले. तर, 42 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
 
पहिली घटना पिशीन जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार असफंदयार खान यांच्या निवडणूक कार्यालयाबाहेर घटली. या स्फोटात 17 जण ठार झाले. तर, 30 जण जखमी झाले.तासाभरातच दुसरी घटना किल्ला अब्दुल्ला परिसरात जमियत-उलेमा इस्लाम-पाकिस्तानच्या निवडणूक कार्यालयाबाहेर घडली. या स्फोटात आठ जण ठार झाले. तर, 12 जण जखमी झाले.
 
असफंदयार खान यांच्या कार्यालयाबाहेर एका पिशवीत हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याचा रिमोटद्वारे स्फोट करण्यात आला, असे बलुचिस्तान पंजगुरमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल्ला जेहरी यांनी सांगितले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी क्वेटा येथे हलवण्यात आले आहे, असे ते म्हणाले.आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढू शकते, असेही ते म्हणाले.नागरिकांना मतदान केंद्रांवर जाण्यापासून रोखण्यासाठी तसेच निवडणुका पुढे जाव्यात, यासाठी दहशतवादी असे हल्ले घडवत असल्याचे जेहरी यांनी सांगितले.स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, किल्ला अब्दुल्ला परिसरात जेयुआय उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयात जोरदार स्फोट झाला.
 

Related Articles