पाकिस्तानात आज मतदान   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सार्वत्रिक आणि प्रांतिक निवडणुकीसाठी आज (गुरूवारी) मतदान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. त्या अंतर्गत 6 लाख 50 हजार सुरक्षा रक्षकांना बोलावले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वा खालील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे पारडे जड आहे. त्यांचा पक्ष विजयी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांचा तेहरीक ए इन्साफ पक्ष आणि बिलावल भुत्तो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी रिंगणात आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल ? हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. 
 
सार्वत्रिक आणि चार प्रांतातील अनुक्रमे सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय आमसभेत 342 जागा असून त्यापैकी 266 जागांवर मतदान होत आहे. त्यात 60 जागा महिलांसाठी आणि 10 अल्पसंख्याक उमेदवारांसाठी राखीव आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 12 हजार 695 उमेदवार असून त्यात 12 हजार 123 पुरूष, 570 महिला आणि दोन तृतीयपंथी उमेदवार आहेत. 12 कोटी 85 लाख जण मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. सर्व मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे. 
 
बलुचिस्तानात बुधवारी एका पाठोपाठ दोन बाँबस्फोट झाल्याने सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. 6 लाख 50 हजार रक्षकांमध्ये पोलिस, नागरी लष्करी दल आणि लष्कराचे सैनिक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे मतदान केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून 26 कोटी मतपत्रिका आणि मतपेट्या मतदान केंद्राकडे रवाना केल्या आहेत. मतपत्रिका पारदर्शक प्लास्टिक डब्यातून आवश्यकतेनुसार मतदान केंद्रावर पाठवल्या गेल्या आहेत. त्या डब्यात ठेवल्यानंतर त्या सीलबंदही केल्या आहेत. त्या मतदानावेळी अधिकार्‍यांसमोर खुल्या करून नंतर मतदानासाठी मतदारांना दिल्या जाणार आहेत. 
 
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 12 कोटी 85 लाख 85 हजार 760 मतदार आहेत. सार्वजनिक निवडणुकीसाठी 5 हजार 121 उमेदवार आहेत. त्यात 4 हजार 807 पुरूष तर, 312 महिला उमेदवार आणि दोन तृतीयपंथी रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर केली आहे. खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात त्या व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.
 

तिरंगी लढत 

 
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) : नवाझ शरीफ
पाकिस्तान पीपल्स पार्टी : बिलावल भुत्तो
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्ष : इम्रान खान
 

Related Articles