मालमोटारीवरील ताबा सुटला   

अपघातात चालक आणि क्लीनरचा मृत्यू
 
सातारा, (वार्ताहर) : पाटण तालुक्यातील ढाणकल गावाच्या हद्दीतील गुहागर-विजयपूर महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास मालमोटारीवरील  वाहकाचा ताबा सुटल्याने मालमोटार डावीकडील टेकडीला धडकली. या अपघातात चालक, क्लीनर असे दोन जण जागीच ठार झाले. या अपघाताची कोयनानगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. लहू त्रंबक माने, अक्षय कांबळे, असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
 
गुहागर-विजयपूर महामार्गावर चिपळूणहून कर्‍हाडच्या दिशेने मालमोटार निघाली होती. ती पाटण तालुक्यात कोयना विभागातील ढाणकल गावाच्या हद्दीत आली असता चिपळूण-कर्‍हाड मार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मालमोटारी वरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे मालमोटार थेट डाव्या बाजूकडील डोंगराच्या टेकडीला जाऊन धडकली. या अपघातात मालमोटार चालक लहू त्रंबक माने (वय 30) व क्लीनर अक्षय कांबळे (27, दोघेही रा. डोंगरेश्वर पाटस, ता. दौंड, जि. पुणे) हे दोघेजण जागीच ठार झाले. मालमोटारीच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह कर्मचार्‍यांनी अपघाताचा पंचनामा केला. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत.हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला आहे. रात्रभर सलग प्रवास करत असल्यास यावेळेत डुलकी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हा अपघातही चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

Related Articles