डीजे चालकांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त   

भीमाशंकर, (वार्ताहर) : लग्नसराईत सर्रास डीजेचा दणदणाट सुरू आहे. वरातीमध्ये दारू आणि डीजेच्या खणखणाटामध्ये तरूणाई बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. डीजेवर निर्बंध असतानाही मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुक्यात दणदणाट सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. डीजेचालकांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 
 
आंबेगाव तालुक्यात काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात विवाहाचा धडाका सुरू आहे. फटाके, दारूवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जात आहेत. सत्कार समारंभात फेटा बांधण्याची फॅशन सुरू आहे. यावर हजारो रूपये खर्च केले जात आहेत. अनाठायी खर्चाबाबत विवाहमालक कोणताही विचार करीत नाहीत. वरातीत दारू आणि डीजेचा खर्च 50 हजाराच्या पुढे आरामात केला जात आहे. डीजेच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच यावर कुणाचे नियंत्रण नसल्यामुळे रात्रभर वरातीत डीजेचा आवाज सुरू असतो. तरूणवर्ग दारू पिऊन बेधुंदपणे नाचत आहेत. त्यामुळे भांडणांचे प्रमाणदेखील वाढत आहे. 
 
गावातील बाजापेठेतून मिरवणूक, वराती सुरू असतात. दुतर्फा राहणार्‍या नागरिकांना आवाजाचा खूप त्रास होतो. आजारी नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांनी डीजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना करूनही डीजेवाले किंवा वरातीत नाचणारी तरूण मुले ऐकायला तयार होत नाहीत. मंचर, पारगाव, घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डीजेचा आवाज सुरू आहे. पोलिसांकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यास त्या डीजेवाल्यांना किंवा संबंधित कार्यमालकाला तक्रार करणार्‍यांचे नाव सांगितले जाते. त्यामुळे डीजेमालक, कार्यमालक तक्रार करणार्‍या नागरिकांच्या विरोधात रोष व्यक्त करतात. 
 

Related Articles