नांदेडमध्ये महाप्रसादातून दोन हजार नागरिकांना विषबाधा   

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोष्टावाडी गावात धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादातून दोन हजार नागरिकांना विषबाधा झाली आहे. कोष्टावाडी गावात मंगळवारी सायंकाळी पालखीनिमित्त भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडार्‍यासाठी स्थानिक लोकांसह आजूबाजूच्या सावरगाव, पोस्टवाडी, रिसनगाव आणि मस्की गावातील शेकडो नागरिक जमले होते. भंडार्‍यानंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बुधवारी पहाटे लोकांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. सुरुवातीला 150 लोकांना नांदेडच्या लोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर इतर लोकांनाही अशाच आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या, त्यानंतर 870 रुग्णांना शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती लक्षात घेऊन गरज भासल्यास नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात आणखी खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 

Related Articles