विशिष्ट अभ्यासक्रम शिकविण्याचे बंधन नसल्याने खासगी विद्यापीठांमधून चांगले शिक्षण मिळेल   

हर्षवर्धन पाटील    

            
पिंपरी : आपल्याकडे शिक्षण चांगले मिळत नाही म्हणून अनेक विद्यार्थी परदेशात जातात. प्रचलित विद्यापीठांमध्ये तेच अभ्यासक्रम शिकविण्याचे बंधन असते. खासगी विद्यापीठांना हे बंधन नसल्याने या विद्यापीठांमध्ये अधिक चांगले शिक्षण दिले जाऊ शकेल, असे प्रतिपादन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 
 
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) 33 वर्षांपासून शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. पीसीईटी अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आता संस्थेने एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) सुरू केले आहे. साते, वडगांव मावळ येथे विस्तीर्ण क्षेत्रात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी युक्त सुसज्ज, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे  पाटील यांनी सांगितले.
 
माध्यम प्रतिनिधींनी नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयू) बुधवारी भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे,  नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
 
16, जानेवारी 2023 मध्ये पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाची घोषणा शासनाने केली; आणि सहा मे 2023 मध्ये मान्यता मिळाली. यानंतर त्वरेने निर्णय घेत विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविताना देशभरातून विद्यार्थी पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.  दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले. त्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला अनेक अभ्यासक्रम  विद्यापीठाने सुरू केले आहेत. यामध्ये  एमबीए इंटरनॅशनल, इंटरनॅशनल स्टडी टूर सॅप सर्टिफिकेशन, तसेच  दुहेरी स्पेशलायझेशन - विपणन, वित्त, व्यवसाय विश्लेषण, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, फार्मास्युटिकल व्यवस्थापन,. संगणक शास्त्र, व्यवस्थापन,  आहारशास्त्र, क्लिनिकल मानसशास्त्र, फार्मास्युटिकल, संगणक विज्ञान, एआय आणि एमएल, मास मीडिया आणि पत्रकारिता, डिजिटल फिल्म मेकिंग, डिझाइन, आरोग्य विज्ञान,  कला (इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इ.) व  पीएचडी - आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.खासगी विद्यापीठांना केंद्र अथवा राज्य शासनाचे अनुदान नाही. स्वायत्तता आहे. इतर विद्यापीठांप्रमाणे तेच ते अभ्यासक्रम शिकविण्याचे बंधन नाही. अभ्यासक्रमांमध्ये वेगळे काही देता येते. त्याचा प्लेसमेंटसाठी मुलांना फायदा होतो. भविष्यात खासगीकरण होणार आहे. लोकांच्या सर्व डिमांड सरकार पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे खासगी विद्यापीठांना पर्याय नसल्याचे पाटील म्हणाले.
 
गुणवंत गरजू  होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने काय तरतूद केली आहे, असे विचारले असता  पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. दर्जेदार शिक्षण, उत्तम प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 34 पेक्षा अधिक विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये यूएसए, रशिया, युके, मलेशिया, थायलंड, इटली, आयर्लंड, जपान, डेन्मार्क, नेदरलँड, व्हिएतनाम इत्यादी देशांमधील विद्यापीठांचा समावेश आहे.मागील वर्षी केंद्र सरकारने पीसीईटीला देशातील ’उत्कृष्ट कॅम्पस’ म्हणून सन्मानित केले. उत्तम शिक्षणामुळे एकोणतीस हजारांहून अधिक विद्यार्थी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत.
 

नवीन सरकार नवीन पॉलिसी तर काय करणार? 

 
खासगी विद्यापीठांशिवाय पर्याय नाही असे सरकारचे धोरण असल्याचे आपण सांगता, मात्र भविष्यात सरकार बदलल्यास नवीन सरकार नवीन पॉलिसी आल्यास या विद्यापीठांना भवितव्य काय असे विचारले असता प्राप्त परिस्थितीत चांगले करण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 

Related Articles