शरद पवारच आमचा पक्ष आणि चिन्ह   

शरद पवार गटाचा निर्धार

 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे शहरात चांगलेच पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या शहरातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने करत नाराजी व्यक्त केली. मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक असल्याचा सूर बैठकीतून उमटला. यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले, शरद पवारच आमचा पक्ष आणि चिन्ह असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
 
अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाच्या शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाच्या पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सत्ताधारी भाजप, केंद्रीय निवडणूक आयोग आणि अजित पवार गटाचा निषेध नोंदविला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मूळ पक्षातून फुटून बाजूला गेलेल्या एका गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. देशातील हुकूमशाही कोणत्या स्तराला गेली आहे याचं हे समर्पक उदाहरण आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ चिन्ह नव्हे, तर लोकनेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. चिन्ह आणि नाव गेले तरी शरद पवार आणि त्यांचे विचार आमच्याकडे आहेत. यापुढे शरद पवार हेच आमचे चिन्ह आणि आमचा पक्ष मानून आम्ही लढाई लढणार आहोत, असे जगताप म्हणाले.
 

लोकसभा निवडणुकीत विरोध राहू नये यासाठी किळसवाणा प्रयत्न

 
शरद पवारांनी राज्यभरात एक-एक मोहरा निवडून त्यातून नेते घडविले. राज्य अनेकदा पिंजून काढून पक्षाची संघटना विणली. दरम्यान, निवडणूक आयोगाने कष्टाने उभारलेला पक्ष सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणार्‍या एका गटाच्या हातात दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी कोणीच अस्तित्वात राहू नये या हीन मानसिकतेतून भाजपने देशभरातील पक्ष फोडण्याचा, दुसर्‍याचा पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याचे किळसवाणे धोरण राबवले आहे. या कृष्णकृत्यात भाजपाचे बाहुलं झालेल्या निवडणूक आयोगाचे सहकार्य आहे. देशातील लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न आहे, आम्ही तो हाणून पाडू, असे जगताप म्हणाले. यावेळी पक्ष कार्यालयाच्या दालनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
 

Related Articles