गानसरस्वती महोत्सव २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान   

पुणे : गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा ‘गानसरस्वती महोत्सव’ या वर्षी 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे, अशी माहिती नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर यांनी दिली. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान महोत्सवाचे सत्र होणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 12:30 दरम्यान तिसरे सत्र तर दुपारी 4 ते रात्री 10 दरम्यान महोत्सवाचे चौथे व शेवटचे सत्र होणार आहे. हा महोत्सव सशुल्क असून महोत्सवाचे सीझन तिकीट हे 200 रूपये असणार आहे. महोत्सवात नवोदित कलाकारांसह ज्येष्ठ कलाकारांची कला रसिक प्रेक्षकांना अनुभविता येणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी  महोत्सवाची सुरुवात युवा कलाकारांच्या तालवाद्याच्या त्रिवेणी आविष्काराने होईल. यामध्ये अभय नायमपल्ली (कर्नाटकी गिटार), मानस कुमार (व्हायोलिन) आणि ईशान घोष (तबला) यांचे सादरीकरण होईल. यानंतर सुप्रसिद्ध गायिका विदुषी कौशिकी चक्रबर्ती यांचे गायन होईल. ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
 
महोत्सवाच्या दुसर्‍या सौरभ काडगांवकर यांचे गायन होईल. यानंतर ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होईल. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाचा समारोप सुप्रसिद्ध सतारवादक पं. नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने होईल. त्यानंतर गायक कलाकार जशन भूमकर यांच्या गायनाने त्याला सुरुवात होईल. यानंतर पं. मिलिंद रायकर आणि त्यांचे शिष्य व सुपुत्र यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन सहवादन होईल. सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने तिसर्‍या सत्राचा समारोप होईल. महोत्सवाच्या चौथ्या व शेवटच्या सत्राची सुरुवात कथक नृत्यांगना विदुषी शर्वरी जमेनीस यांच्या नृत्याविष्काराने होईल. 
 
त्यानंतर शंतनू गोखले संतूर वादन करतील. पं. विश्वमोहन भट यांचे मोहनवीणा वादन होईल. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप होईल. आज (गुरूवार) पासून बुक माय शोवर, तर 15 फेब्रुवारीपासून बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि टिळक स्मारक या ठिकाणी तिकिटे उपलब्ध होतील.
 

Related Articles