तिसर्‍या कसोटीपूर्वी राजकोट क्रिकेट स्टेडियमचे बदलणार नाव   

राजकोट : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र त्यानंतर भारतीय संघाने धमाकेदार पुनरागमन करत दुसरा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. 
 
मात्र आता सामन्यापूर्वीच या स्टेडियमचे नाव बदलण्यात येणार आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नामकरण माजी प्रथम श्रेणी खेळाडू आणि वरिष्ठ प्रशासक निरंजन शाह यांच्या नावावर करण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 15 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला एससीएच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. स्टेडियमच्या नवीन नावाचे अनावरण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते होणार आहे, 11 वर्षांनी त्याचा पहिला सामना आयोजित केला आहे.
 
निरंजन शाह यांनी सौराष्ट्रसाठी 12 प्रथम श्रेणी सामने खेळले. ते देशातील सर्वात वरिष्ठ क्रिकेट प्रशासकांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा आणि माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जयदेव शाह हे स्थानिक क्रिकेट प्रशासकीय मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जयदेवने सौराष्ट्रचे कर्णधारपदही भूषवले आणि आयपीएलमध्येही खेळला आहे. निरंजन शाहने 12 प्रथम श्रेणी सामन्यात 281 धावा केल्या आहेत.
 
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकला. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले आणि 209 धावांची खेळी खेळली. याशिवाय शुभमन गिलने शतक झळकावले होते. जसप्रीत बुमराह दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट घेतल्या. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
 

Related Articles