मथुरेतील कृष्ण मंदिर पाडून औरंगजेबाने उभारली मशीद   

पुरातत्त्व विभागाकडून पुरावा सादर 

 
नवी दिल्‍ली : मुघल बादशाह औरंगजेबाने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर तोडून त्या जागेवर मशीद उभारली होती. त्याबाबतचा पुरावा असल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. 
 
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबतच्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच पुरातत्त्व विभागाने या प्रकरणातील हा पुरावा सादर केला आहे. या वादग्रस्त जमिनीबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना भारतीय पुरातत्त्व विभागाने हा मोठा खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, मुघल बादशाह औरंगजेबाने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर तोडून त्या जागेवर मशीद उभारली होती. विभागाने 1920 मधील ऐतिहासिक पुरावे आणि दस्तऐवजांच्या आधारावर ही माहिती सादर केली आहे. शाही ईदगाह मशीदप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुरावा म्हणून विभागाचा  हा अहवाल आता महत्त्वाचा ठरू शकतो.
 
भारतीय पुरातत्त्व विभागाने नोव्हेंबर 1920 मध्ये या वादग्रस्त जागेची पाहणी केली होती. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विभागाने केलेली पाहणीचा जुना अहवाल मागितला होता. त्यावर उत्तर देताना आग्रा येथील पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे की, संबंधित वादग्रस्त जागेवर कृष्णाचे मंदिर होते. औरंगजेबाने ते तोडून तेथे शाही ईदगाह मशीद बांधली. अजय सिंह यांना माहिती अधिकारात मिळालेली माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
 

Related Articles