कर्नाटक काँग्रेसचे आज जंतर-मंतरवर आंदोलन   

बंगळुरू : केंद्रातील भाजप सरकारकडून महसूल आणि अनुदानाच्या बाबतीत अन्याय केला जात असल्याचा आरोप कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) नवी दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.कर्नाटकातील मंत्र्यांसह सर्व काँग्रेस आमदार आणि खासदार आज सकाळी 11 वाजता जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहेत. 15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत कर्नाटकाचे 1.87 लाख कोटींचे कथित नुकसान केंद्राने भरून काढावे, अशी कर्नाटक काँग्रेसची प्रमुख मागणी आहे.
 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) ज्येष्ठ नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हेदेखील मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसह 8 फेब्रुवारी रोजी केेंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारकडून दक्षिणेकडील राज्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
दुसरीकडे, कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारी केंद्राच्या विरोधात, विशेषत: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातंर्गत (मनरेगा) अंतर्गत राज्याची थकबाकी रोखल्याबद्दल केंद्राच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.कर्नाटक काँग्रेसने कधीही दिल्लीत आंदोलन केले नव्हते. परंतु, अपरिहार्य कारणांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. 
 

Related Articles