मौजमस्ती करण्याच्या नादात तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यू   

लोणावळा (वार्ताहर) : आपल्या मित्रांसोबत मौजमस्ती करण्यासाठी तुंगार्ली धरणावर गेलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पाचारण करण्यात आलेल्या शिवदुर्गच्या बचाव पथकाने सोमवारी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत एक तासानंतर मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत दोन तास शोध मोहीम राबवित या युवकाचा मृतदेह बाहेर काढला.
 
मृत युवकाचे नाव अभिषेक सिंह रावत (वय 23, मूळ रा. पटान, पिथोरागड, उत्तराखंड) असे असून तो खंडाळ्यातील झारा रिसॉर्ट याठिकाणी कामाला होता. मृत अभिषेक आणि त्याच्यासोबत काम करणारे गोविंद सिंग त्रिलोकसिंगमहर (वय 24)अखिलेशसिंग वीरेंद्र सिंग नेगी (वय 28) आणि रमेशसिंग बालाकसिंग कोशीयारी (वय 35, सर्व मूळ रा. उत्तराखंड) असे चौघेजण सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली धरणावर फिरायला गेले. त्याठिकाणी अभिषेक हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना कळताच शिवदुर्ग मित्र बचाव पथकाचे सदस्य आणि लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिषेक याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार झाल्याने सोमवारी ही मोहीम थांबवण्यात आली. 
त्यानंतर  मंगळवारी सकाळी 9 वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अभिषेक याचा मृतदेह 11 वाजण्याच्या सुमारास हाती लागला.
 
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. शिवदुर्ग बचाव पथकातील सुनील गायकवाड, महेश मसणे, आनंद गावडे, विनायक शिंदे, कुणाल कडू, आकाश मोरे, प्रिन्स बैठा, मयुर दळवी, शनी सुतार, प्रणय अंभोरे, समीर देशमुख, प्रणव दुर्गे, साहिल दळवी, सचिन तारे, निलेश लाड, अतुल लाड, महादेव भवर, प्रविण देशमुख, दुर्वेश साठे, गणेश रौंधळ, अनिल सुतार, योगेश दळवी हे सदस्य या बचाव कार्यात सहभागी झाले होते.
 

Related Articles