पुण्यासह राज्यभरातील तपमानात वाढ   

पुढील आठवड्यात थंडी निरोप घेणार 

 
पुणे : लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वार्‍याचा वेग ताशी 270 ते 300 किलोमीटर आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत थंडी लांबली आहे. यंदा 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे. त्यानंतर ती निरोप घेईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. 
 
पुण्यासह राज्यात वाढलेले तपमान 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. उत्तरेतून आलेल्या थंड वार्‍यांमुळे संपूर्ण जानेवारी महिन्यात थंडी कायम होती. थंड वार्‍यांमुळे यंदा राज्यातील थंडीचा मुक्काम वाढला होता; मात्र पुढच्या आठवड्यात राज्यातून थंडी निरोप घेणार असल्याचा अंदाज आहे. लागोपाठ पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात 12 कि.मी. उंचीवरील हवेच्या थरात ताशी 270 ते 300 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या पश्चिमी वार्‍याच्या झोतामुळे यंदा थंडीचा कालावधी वाढला आहे. आगामी तीन दिवसांत कमाल आणि किमान तपमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परीक्षेत्रात तीन दिवसांत काहीसे ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तपमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. 
 
पुढील चार दिवस कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. काल राज्यात नाशिक येथे नीचांकी 13.6 अंश किमान तपमानाची 
नोंद झाली. 
 

शहर व परिसरातील तपमान 

 
ठिकाण कमाल    किमान
शिवाजीनगर 35 अंश 16 अंश
पाषाण 34 अंश 16.9 अंश
लोहगाव 36 अंश 18.8 अंश
मगरपट्टा 35 अंश 21.1 अंश
एनडीए 36 अंश 14.9 अंश
कोरेगाव पार्क 36 अंश 20.1 अंश
 

Related Articles